मुंबई

अटल सेतूवर कारसाठी २५० रुपये टोल; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद‌्घाटन

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू अर्थात एमटीएचएलचे येत्या १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद‌्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या पुलावरून धावणाऱ्या कार अर्थात चारचाकी वाहनासाठी २५० रुपये इतका टोल निश्चित केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत टोल आकारणीच्या दरावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारणपणे टोल आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने टोल आकारण्यात येणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.

एमटीएचएलवर कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी परतीचा पास एकेरी टोलच्या दीडपट, दैनिक पास एकेरी टोलच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी टोलच्या ५० पट अशी सवलत देण्यात आली आहे. अटल सेतू उभारणीसाठी २१ हजार २०० कोटी रुपये इतका खर्च आला असून त्यापैकी १५ हजार १०० कोटी इतके कर्ज घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान ५०० रुपये इतकी बचत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या शून्य ते चार किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक आणि अतिसंवेदनशील अशा भाभा अणु संशोधन केंद्र तसेच माहुल येथील तेल शुद्धीकरण केंद्र या चार ते दहा किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसविण्यात आले आहेत. अटल सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या पथकर दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त