मुंबई: कामा व आल्बलेस शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी तब्बल 3 जुळ्यांनी बुधवारी जन्म घेतला आहे. रुग्णालयातील प्रसूतींची आकडेवारी पाहता यामध्ये मागील काही वर्षांमध्ये जुळी मुले जन्मास येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जुळ्या बाळांचा जन्मदर वाढत असल्याचे निरीक्षण आहे. पूर्वीच्या काळात ७० पैकी एका घरात जुळ्या मुलांचा जन्म व्हायचा; मात्र वंधत्व निवारण आणि त्याच्यावरील उपचारांमुळे आता हे प्रमाण दहा ते बारा टक्क्यांनी वाढत असल्याचे डॉक्टरने सांगितले आहे.
सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या अखत्यारीत येणारे कामा व आल्बलेस हे फक्त प्रसूती आणि स्त्री रोग तसेच बाल रुग्णांसाठी असलेले महाराष्ट्रातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयात २६ आणि २७ जुलैच्या २४ तासांमध्ये म्हणजेच एका दिवसांमध्ये तीन महिलांनी जुळ्यांना जन्म दिला आहे. सुमय्या अल्ताफ अहमद मोमीन या महिलेने सिझेरियन सेक्शन या प्रसूतीच्या पद्धतीने बुधवारी एक वाजून ३४ मिनिटांनी आणि एक वाजून ३५ मिनिटांनी जुळ्यांना जन्म दिला. हे जुळे मोनोकोरिओनिक या जुळ्यांच्या प्रकारातील असून, दोन्ही बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वसीफा चोप्रा या नावाच्या महिलेने देखील प्रसुतीचे दिवस पूर्ण भरण्याच्या मंगळवारी रोजी जुळ्यांना जन्म दिला आहे. हे जुळे नॉर्मल पद्धतीने जन्मास आले आहेत.
सिमरन अन्सारी या महिलेने गुरुवारी तिसऱ्या जुळ्यांस जन्म दिला. सिझेरियन सेक्शन या प्रसुती पद्धतीने जन्म दिला आहेत. ही दोन्ही बाळे मोनोकोरिओनिक या जुळ्यांच्या प्रकारातील असून दोन्ही मुलगी आहेत. यातील पहिल्या बाळाचे वजन अधिक कमी असल्यामुळे नवजात अर्भक अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती देखील स्थिर असल्यामुळे त्याला नळीद्वारे दूध देण्यास सुरुवात झालेली आहे, असे अधीक्षक डॉ तुषार पालवे यांनी सांगितले.