मुंबई : पगार कपातीचा इशारा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेले महापालिकेचे ३९०० कर्मचारी कामावर परतले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. पालिका सेवेत रुजू न होणाऱ्या ५००० कर्मचाऱ्यांना वेतन कपात करण्याचा इशारा पालिकेच्यावतीने देण्यात आला होता. उरलेले ११०० कर्मचारी लवकरच सेवेत रुजू होतील असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली होती. यामुळेच निवडणुकीच्या कामात महापालिकेच्या तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील अनेक कर्मचारी निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशिक्षणासाठी जात होते. प्रत्यक्ष मतदानाच्या काळात मोठ्या संख्येने महापालिका कर्मचारी उपलब्ध करण्यात आले. मात्र, निवडणुका झाल्या आणि सरकार स्थापन झाल्यानंतरही पालिका कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगोकडून मुक्त करण्यात आले नव्हते.
वेतनकपातीचा धसका घेऊन पालिकेचे निम्म्याहून कर्मचारी सेवेत दाखल झाले. दरम्यान पालिकेचे ५००० कर्मचारी निवडणूक आयोगाच्या सेवेत कार्यरत होते. तथापि, पालिकेच्या कडक इशाऱ्यानंतर ३९०० कर्मचारी नुकतेच पालिका सेवेत रुजू झाले आहेत. तर ११०० कर्मचारी लवकरच सेवेत दाखल होतील. जर हे ११००कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास वर्षाच्या सुरुवातीलाच या कर्मचाऱ्यांना वेतन कपातीला सामोरे जावे लागेल, अशी पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
सर्वाधिक कर्मचारी लेखा व पेन्शन विभागाचे
निवडणुका झाल्या आणि सरकार स्थापन झाल्यानंतरही पालिका कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगोकडून मुक्त करण्यात आले नव्हते. यामध्ये सर्वाधिक कर्मचारी हे लेखा विभाग, पेन्शन विभागासह अन्य विभागांतील होते. यामुळे या विभागातील कामांवर विशिष्ट परिणाम होत होता. त्यामुळे पालिकेच्या वतीने वेतन कपातीचा कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला होता.