मुंबई

डिसेंबरपर्यंत आणखी ५० ‘आपला दवाखाना’; वर्षभरात २३ लाख रुग्णांवर उपचार

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी

मुंबई : ‘घराजवळ दवाखाना’ या संकल्पनेवर आधारित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईत सुरू करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत १९४ आपला दवाखाना सेवेत असून २३ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत आणखी ५० आपला दवाखाना मुंबईकरांच्या सेवेत येतील, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ‘आपला दवाखाना’ योजना मुंबईकरांपर्यंत पोहोचावी, यासाठी रचलेल्या जनजागृतीपर गीताच्या ध्वनिफीतीचे लोकार्पण मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील वार्ताहर कक्षात झाले.

स्लम एरियातील लोकांना घराजवळ उपचार मिळावे, यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑक्टोबर २०२२ मध्ये धारावीत करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत १९४ आपला दवाखाना लोक सेवेत कार्यरत आहेत. यात २८ पॉलिक्लिनिक, ६३ पोर्टा कॅबिन असून यात वर्षभरात २३ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यांत आणखी ५६ आपला दवाखान्यांची भर पडणार असून डिसेंबर अखेरपर्यंत २५० आपला दवाखाना लोकांच्या सेवेत असतील, असेही शिंदे यांनी सांगितले.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'च्या वर्षपूर्तीनिमित्त व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीने ही ध्वनिफीत तयार करण्यात आली आहे. या ध्वनिफितीमध्ये असणाऱ्या जनजागृतीपर गीताचे शब्द हे गीतकार संदीप सुर्वे यांचे असून संगीत हे संगीतकार डॉ. संजयराज यांचे आहे. या गीताचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गीताच्या तीन गायकांपैकी डॉ. राहुल जोशी व डॉ. नेहा राजपाल हे वैद्यकीय डॉक्टर आहेत. याव्यतिरिक्त दिया वाडकर या चिमुकलीनेदेखील या गाण्यामध्ये गायन केले आहे. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा आणि डॉक्टर्स व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

सुविधांबाबत सूचना कळवा

संपूर्ण मुंबई महानगरात अतिशय दाटीवाटीची लोकसंख्या आहे. नागरिकांना आपला दवाखानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांचे अभिप्राय देता यावेत, यासाठी दवाखान्यांच्या ठिकाणी सूचनापेटी ठेवण्यासोबतच अभिप्राय देण्याचीही सुविधा देण्यात येईल, असेही लोढा यांनी सांगितले.

१४७ प्रकारच्या मोफत चाचण्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवादेखील पॉलीक्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपला दवाखाना हे प्रामुख्याने सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीत कार्यरत आहेत.

६० हजारांहून अधिक रुग्णांवर विविध उपचार

या पैकी पॉलीक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रे येथे ६० हजाराहून अधिक रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्री रोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचा रोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे. यातून मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सेवेत महानगरपालिकेने आणलेली ही योजना अतिशय लोकाभिमुख असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यापाठोपाठ ठाण्यातही महायुती तुटली! अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

मुंढवा जमीन : ३०० कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत तेजवानीचे 'मौन'च

"आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली तर..."; पुण्यात अजित पवारांच्या NCP सोबत का नाही लढणार? फडणवीसांनी केलं स्पष्ट

PMC Elections 2025 : पुण्यात महाविकास आघाडीचं ठरलं! एकत्र निवडणूक लढणार; मनसेबाबतचा निर्णय...

BMC Election : मुंबईत महायुती एकत्र लढण्यास सज्ज; मविआत मनसेवरूनच मतभेद