मुंबई

पावसाळी कामे बोंबलली! पालिकेतील ५० हजार स्टाफ निवडणूक कामाला;रस्त्यांची, नालेसफाईची कामे आधीच रखडली

रस्त्यांची कामे, नालेसफाईची कामे आधीच रखडली असताना, आता लोकसभा निवडणुकीसाठी पालिकेतील विविध १६ विभागांतील ५० हजार अधिकारी व कर्मचारी निवडणूक ड्युटीला जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : रस्त्यांची कामे, नालेसफाईची कामे आधीच रखडली असताना, आता लोकसभा निवडणुकीसाठी पालिकेतील विविध १६ विभागांतील ५० हजार अधिकारी व कर्मचारी निवडणूक ड्युटीला जाणार आहेत. सद्यस्थितीत १२ हजार अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामासाठी आधीच गेले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असल्याने त्यानंतर पुढील तीन दिवस ५० हजार अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे यंदा पावसाळी कामे बोंबलणार, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि निवडणुकीच्या कामाला सगळ्याच यंत्रणा लागल्या आहेत. देशभरात लोकसभा निवडणुकीचा तयारी सुरू असून राज्य सरकार व मुंबई महापालिकाही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्य सरकारचा कर्मचारीवर्ग व मुंबई महापालिकेचा स्टाफ असा एकूण ७० टक्के कर्मचारीवर्ग निवडणुकीच्या कामासाठी जातो. मुंबई महापालिकेचे एकूण १ लाख २ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. पालिकेच्या विविध विभागाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यात रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिनी, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन, अशा प्रमुख विभागातील स्टाफ निवडणुकीच्या कामात व्यस्त होणार असल्याने या कामांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, पावसाळी कामांसाठी उर्वरित स्टाफ कार्यरत राहणार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येणार, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीचे काम बंधनकारक

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मागणीनुसार आस्थापनेतील किमान ७० टक्के कर्मचारी देणे बंधनकारक आहे. यामध्ये स्थानिक प्रशासने, बँकांमधील कर्मचारी निवडणूक कामासाठी बोलावले जाऊ शकतात. यानुसार मागणीनुसार कर्मचारी पाठवणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये ‘क’, ‘ड’ वर्गाचे कर्मचारी जाणार आहेत.

९ हजार पोलिंग बुथ, ५४ हजार कर्मचारी

मुंबईत ९ हजार पोलिंग बुथ आहेत. प्रत्येक बुथवर चार ते सहा कर्मचारी नियुक्त केले जात असल्याने एकूण ५४ हजार कर्मचारीवर्ग पोलिंग बुथवर कार्यरत असणार आहे.

या विभागातील कामांवर परिणाम!

रस्ते, मलनि:सारण, पर्जन्य जलवाहिनी, पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन

निर्णायक पाऊल उचलावे लागणार

दरवर्षी मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाई मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. ३१ मे अखेरपर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण होणे आवश्यक असते. मात्र मार्च महिना संपत आला तरी नालेसफाई अद्याप सुरू झालेली नाही. तर ४०० किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणातील १० ते १५ टक्के कामेच पूर्ण झाली आहेत. तर पावसाळ्याआधी खड्डे बुजवणे, मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करणे, आपत्ती व्यवस्थापन-आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, अशा कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही कामे कंत्राटदारांच्या माध्यमातून होत असली तरी देखरेख ठेवण्यासाठी पालिकेकडे कर्मचारीच राहणार नाहीत. त्यामुळे पालिकेला यासाठी निर्णायक पाऊल उचलावे लागणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली