मुंबई

राजावाडी रुग्णालयात ५१७ रक्त पिशव्यांची नासाडी

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली

स्वप्नील मिश्रा

रक्त हे जीवन आहे, असे एकीकडे बोलले जात असतानाच दुसरीकडे रक्ताची नासाडी करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दोन वर्षात ५१७ पिशव्या (१२५.५ लिटर) रक्त वाया गेल्याचे उघड झाले.

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली आहे. २०२१ मध्ये २९२ रक्तपिशव्या (५८.५ लिटर) तर संपूर्ण शहरात २२५ रक्तपिशव्या (६७ लिटर) मुदत संपल्याने वाया गेल्या आहेत. शहराची रोजची रक्ताची गरज ९५२ युनिट आहे. शहरात अनेक ठिकाणी अनियोजित पद्धतीने रक्त शिबीरे घेण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची नासाडी होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी म्हणाले की, गरज लक्षात घेऊन रक्त गोळा करणे गरजेचे आहे. यात गैरव्यवस्थापन होत आहे. त्यामुळे रक्ताची नासाडी होते. यापूर्वी रक्ताची नासाडी केल्यास रक्तपेढीचा परवाना रद्द करत होता. तसेच रुग्णालयांनी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत. रक्तदात्याकडून घेतलेल्या रक्ताची तपासणी न केल्याने त्याची मुदत संपली. तसेच रक्तपेढ्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. २०१९ मध्ये राजावाडी रुग्णालयाने रक्तपेढीसाठी ६ नवीन तंत्रज्ञांच्या जागा निर्माण केल्या आहेत. मात्र, त्या अजूनही भरलेल्या नाहीत.

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात म्हणाले की, गेले दोन वर्षे रक्ताची नासाडी केल्याबद्दल आपण राजावाडी रुग्णालयासोबत चर्चा करणार आहोत. आम्ही प्रत्येक रक्तपेढीला वर्षभराचे नियोजन करून त्यानंतरच शिबीर भरवायला सांगतो. कारण नियोजन न करता रक्तदान शिबीर भरवल्यास गरजेपेक्षा अतिरिक्त रक्त जमा होते. त्यानंतर ते वाया जाते.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस