मुंबई

मुंबईमधील ८० टक्के रुग्ण क्षयरोगमुक्त; टीबीमुक्त मुंबई मोहिमेंतर्गत विभागनिहाय कृती आराखडा तयार

मुंबईमध्ये औषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारांचा यशाचा दर ८०% आहे, जो गेल्या आठ वर्षांत दुप्पट झाला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईमध्ये औषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारांचा यशाचा दर ८०% आहे, जो गेल्या आठ वर्षांत दुप्पट झाला आहे. हे गुणवत्ताधारित निदान सेवेमध्ये सातत्याने सुधारणा, नवीन औषध उपचार पद्धती आणि पालिका आरोग्य विभागाने डीआरटीबी रुग्णांना प्रदान केलेल्या मार्गदर्शन व सहाय्यामुळे शक्य झाले आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

‘टीबी मुक्त विभाग’ आणि ‘टीबीमुक्त मुंबई’ हे ध्येय साध्य करण्यासाठी विभागनिहाय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा विभागनिहाय पातळीवर सज्ज झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये, मुंबईमध्ये एकूण ६० हजार ६३३ क्षयरोगाचे रुग्ण आढळले, त्यापैकी ५३ हजार ६३८ क्षयरोगाचे रुग्ण मुंबईत वास्तव्यास होते. एकूण रुग्णांपैकी ३८ टक्के हे फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आणि ६ टक्के बालरुग्ण होते. तर ९% हे औषध-प्रतिरोधक रुग्ण होते.

जागतिक क्षयरोग दिनी राबवले जाणारे उपक्रम

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ विभागांमध्ये क्षयरोग जनजागृती मोहिमेंतर्गत बाइक रॅली, मॅरेथॉन, पथनाट्य, आरोग्यविषयक व्याख्याने आणि जिंगल्सद्वारे माहिती दिली जाईल.

क्षयरोगाच्या संपर्कातील व्यक्तींना जागरूक करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.

क्षयरोगाची १० प्रमुख लक्षणे

२ आठवड्यांहून अधिक कालावधीचा खोकला, ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, दम लागणे, खोकताना रक्त येणे, थकवा आणि मानेवर गाठ येणे अशी आहेत.

वरील लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या BMC दवाखान्यात मोफत तपासणी करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.

क्षयरोग नियंत्रणासाठी हाती घेतलेले विशेष उपक्रम

- १०० दिवस मोहीम

- निदान सुविधांचे अद्ययावतीकरण

- सर्व क्षयरुग्णांसाठी 'Differentiated TB Care'

- औषध-प्रतिरोधक क्षयरुग्णांसाठी BPaLM उपचारपद्धती

- क्षयरोग निदानासाठी WGS तंत्राचा वापर

- हँडहेल्ड X-रे मशीन

- क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपक्रम

- क्षयरोग रुग्णालय, शिवडीचे अद्ययावतीकरण

- पोषण आहार

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली