मुंबई

परळ येथे ६० वर्षांच्या वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला

जखमी कांतीलाल यांना नंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नवशक्ती Web Desk

मुंबई : परळ येथे कांतीलाल आनंद अडसूळ या ६० वर्षांच्या वयोवृद्धावर त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कांतीलाल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी हल्लेखोर बाबल ऊर्फ देवीदास पांडुरंग चिंदरकर याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

परळ परिसरात राहणाऱ्या कांतीलाल यांचा केईएम रुग्णालयाच्या गेट दोनसमोर जेवणासह इडली वडाविक्रीचा एक स्टॉल आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांचा परिचित बाबल याच्यासोबत त्यांचे क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या वादानंतर त्याने त्यांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण करून धमकी दिली होती. मात्र कांतीलाल यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार करणे टाळले होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता ते परळ येथील विठ्ठल चव्हाण मार्ग, बीआयटी चाळीसमोरून सामान घेऊन जात असताना बाबलने कांतीलाल यांच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने त्याच्याकडील चाकूने त्यांच्यावर वार केले. त्यात त्यांच्या गालावर, छातीवर आणि पोटावर दुखापत झाली होती. जखमी कांतीलाल यांना नंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. कांतीलाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाबल चिंदरकर याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी