मुंबई

तानसा जलवाहिनीला अचानक गळती; दादर, सांताक्रुझ, अंधेरीसह भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित

पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील पुलाजवळ असलेल्या तानसा पश्चिम जलवाहिनीत मंगळवारी पहाटे अचानक गळती सुरू झाली.

Swapnil S

मुंबई : पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील पुलाजवळ असलेल्या तानसा पश्चिम जलवाहिनीत मंगळवारी पहाटे अचानक गळती सुरू झाली. त्यामुळे पालिकेच्या जल अभियंता खात्याने आता जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, त्या कामासाठी तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा काही वेळेसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दादर, सांताक्रुझ, अंधेरीसह भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पवई व्हेंचरजवळ जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता पुलाजवळ (जेव्हीएलआर) मंगळवारी पहाटेच्‍या सुमारास १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीत मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी झडपा (व्हॉल्व्ह) तातडीने बंद करण्यात आल्या. गळती रोखून दुरुस्ती करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर हाती घेण्‍यात आले आहे. या दुरुस्ती कामकाजाकरिता २४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुरुस्तीअंतर्गत मुख्य जलवाहिन्यांचे पृथक्करण पवई ते मरोशीपर्यंत करण्यात येणार आहे. या पृथक्करण कार्यवाहीमुळे के-पूर्व विभाग, एस विभाग, एच-पूर्व विभाग आणि जी-उत्तर विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्ती कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे व महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

या परिसरात पाणीपुरवठा बंद

एस विभाग : गौतमनगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्ता, मिलिंद नगर, एल ॲण्ड टी परिसर.

के-पूर्व विभाग : ओम नगर, सहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रुग्णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर.

जी-उत्तर विभाग : धारावी

एच-पूर्व विभाग : बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस.

Thane : 'अनधिकृत होर्डिंग्ज हटवा'; बॅनर दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

'गाडी थांबवली असती तर…'; धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा मृत्यू; वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याचा सहप्रवाशाचा आरोप, VIDEO

इराणचा UAE च्या दोन जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, आठ जण जखमी

कर्मचाऱ्यांसाठी 'हितसंबंधांचा संघर्ष' नियम अधिसूचित; SEBI चे गुंतवणुकीचे नियम कुटुंबीयांनाही लागू; दोन वर्षांचा ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी समाविष्ट

Mumbai : मॅनहोल सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड'; लुकलुकणारे दिवे मॅनहोल दुरुस्तीवेळी महत्त्वपूर्ण ठरणार