मुंबई : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाने गती घेतली आहे. या प्रकल्पातील एकमेव भूमिगत स्थानक मुंबईतील बीकेसीमध्ये उभारण्यात येत आहे. या स्थानकाच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा असलेला पहिला बेस स्लॅब टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. हा स्लॅब ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला असून तो १० मजली इमारतीच्या समतुल्य आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाची (बुलेट ट्रेन) लांबी ५०८ किलोमीटर आहे. यामध्ये १२ स्थानके नियोजित आहेत. यामधील मुंबईतील बीकेसीमधील एकमेव स्थानक भूमिगत आहे. या स्थानकाचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब नुकताच टाकण्यात आला. हा स्लॅब जमिनीपासून सुमारे ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला आहे. जमिनीच्या पायापासून काँक्रीटचे काम सुरू करण्यात आले आहे.
दोन इन-सिटू बॅचिंग प्लांटद्वारे काँक्रीटचा पुरवठा करण्यात येत आहे. काँक्रीट ओतण्याचे तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी इन-सिटू बर्फ आणि चिलर प्लांटद्वारे तापमान नियंत्रित करण्यात येत आहे. हा स्लॅब ३.५ मीटर खोल असून त्याची लांबी सुमारे ३० मीटर आणि रुंदी २० मीटर आहे. या स्थानकाचे काम पूर्ण करण्यासाठी ६९ स्लॅब टाकण्यात येणार आहेत.
बीकेसी स्थानकाची वैशिष्ट्ये
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात येणारे हे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे एकमेव भूमिगत स्थानक आहे.
या स्थानकाचा प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे २४ मीटर खोलीवर नियोजित आहे.
या स्थानकात प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले असतील. या कामासाठी जमिनीपासून ३२ मीटर खोलीपर्यंत खोदकाम करण्यात येत आहे.
स्थानकामध्ये ६ प्लॅटफॉर्म असतील. या प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे ४१५ मीटर असेल. या प्लॅटफॉर्मवर १६ डब्यांची बुलेट ट्रेन थांबू शकेल.
मेट्रो लाईन २ ब च्या जवळ आणि एमटीएनएल इमारतीकडे जाण्यासाठी दोन प्रवेश/एक्झिट पॉइंट्सचे नियोजन केले आहे.नैसर्गिक प्रकाशासाठी समर्पित स्कायलाइटची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमधील मुंबई बुलेट ट्रेन स्थानक हे एकमेव भूमिगत आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी हे ३२ मीटर खोल स्टेशन बांधण्यासाठी सुमारे १८.७ लाख घनमीटर उत्खनन करण्यात येणार आहे. त्यापैकी ५२ टक्के उत्खनन पूर्ण झाले आहे. घटनास्थळी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे वापरली जात आहेत. पहिला बेस स्लॅब पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
- विवेक कुमार गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एनएचएसआरसीएल