PM
मुंबई

वर्सोवा ते दहिसर प्रकल्पाला गती :चार वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट; १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Swapnil S

मुंबई : मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोडचे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असताना वर्सोवा ते दहिसर प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा - दहिसर प्रकल्पासाठी चार कंत्राटदार फायनल करण्यात आले आहेत. १८.४७ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सहा पॅकेज मध्ये काम होणार असून, पुढील चार वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पालिकेने ठेवले आहे.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ झाला आणि सद्यस्थितीत ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असताना वर्सोवा - दहिसर प्रकल्पासाठी चार कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम उपनगरातील वर्सोवा हे मुंबईच्या उत्तर टोकावरील समुद्र किनाऱ्यावरील गाव असून ते मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या दहिसरशी जोडले जाणार आहे. या कामासाठी ऑगस्टमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, नवीन वर्षांत गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

दरम्यान, शुक्रवारी या निविदांचे सी पाकिट उघडण्यात आले. एकूण सहा पॅकेजमध्ये हे काम चालणार असून त्यासाठी चार बड्या कंत्राटदारांची निवड झाली आहे. या चारही कंपन्या सध्या मुंबईत बांधकामे सुरू असलेल्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत. एल ॲण्ड टी कोस्टल रोडच्या मरीन ड्राइव्ह वरळी प्रकल्पात काम करत आहे. तर मेघा इंजिनीअरिंग आणि एनसीसी लिमिटेड यांना मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम देण्यात आले आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित कामे जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सना देण्यात आली आहेत.

काम आणि कंत्राटदार

 पॅकेज ए : वर्सोवा ते बांगूर नगर, गोरेगाव ४.५ किमी

ॲप्को इन्फ्राटेक्ट प्रा. लि.

 पॅकेज बी : बांगूर नगर ते माइंडस्पेस, मालाड

१.६६ किमी

जे. कुमार आणि एनसीसी लिमिटेड (संयुक्त)

 पॅकेज सी आणि डी : उत्तर आणि दक्षिणेकडे जाणारा सर्विस रोड, मालाड माइंडस्पेस ते चारकोप कांदिवली ३.६६ किमी

मेघा इंजिनियरिंग

पॅकेज ई : चारकोप ते गोराई

३.७८ किमी

लार्सन अँड टुब्रो

 पॅकेज एफ : गोराई ते दहिसर ३.६९ किमी

ॲप्को इन्फ्राटेक्ट प्रा. लि.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस