मुंबई

कारसाठी घेतलेल्या पैशांचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक

१२ लाख १२ हजार रुपयांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली

प्रतिनिधी

मुंबई : कारसाठी घेतलेल्या बारा लाखांचा अपहार केल्याच्या कटातील एका आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रितीक संतोष सुतार असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांत त्याच्यासोबत अक्षय संतोष सुतार, रिया सुतार आणि त्याची आजी असे तीनजण सहआरोपी आहेत. अटकेनंतर रितीकला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरी येथे राहणारे तक्रारदार एका खाजगी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी असून त्यांच्या संस्थेचे कार्यालय मानखुर्द परिसरात आहे. त्यांना कामानिमित्त एक कार खरेदी करायची होती. यावेळी त्यांच्या परिचित संतोष खरातने त्यांची ओळख अक्षय सुतारशी करुन दिली होती. अक्षय हा त्यांच्या घरी आला आणि त्याने त्यांना एका कारची माहिती दिली होती. कारची दहा दिवसांत डिलीव्हरी करण्याचे आश्‍वासन देऊन त्याने कारची बुकींग म्हणून त्यांच्याकडून ५१ हजार रुपये घेतले होते. मार्च महिन्यांत त्यांचे दोन कर्मचारी मुलुंड येथील एका कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना अक्षय आणि त्याची पत्नी रिया भेटली. या दोघांनी त्यांना कारच्या चेसीस, इंजिन क्रमांक देऊन उर्वरित पेमेंट करण्यास सांगितले. पेमेंट केल्यांनतर दोन दिवसांत कारची डिलीव्हरी होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कारसाठी १२ लाख ८१ हजार ४१९ रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र एक आठवडा उलटूनही त्यांनी कारची डिलीव्हरी केली नाही. मुलुंड येथील कार्यालयात गेल्यानंतर अक्षय, रिया हे बाहेर मिटींगसाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे त्यांनी कार डिलीव्हरी न करता त्यांचे पेमेंट करा यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. यावेळी या दोघांनी त्यांना एक लाख वीस हजार रुपये पाठवून दिले. मात्र उर्वरित १२ लाख १२ हजार रुपयांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. मुलुंड येथील घरी गेल्यानंतर त्याच्या आईने आठ दिवसांत पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिले, मात्र त्यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी सुतार कुटुंबातील चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच रितीक सुतारला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

कचऱ्यासाठी विशेष मोहीम; BMC चा सोमवारपासून उपक्रम; पंधरवड्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणार

शहाड उड्डाणपूल १८ दिवसांसाठी बंद; १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार