मुंबई

मालवणीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक; दुचाकीचोरीच्या संशयावरून मारहाण करून हत्येचा आरोप

दुचाकी चोरीच्या संशयावरून इम्रानने सचिनची बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप

Swapnil S

मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात सचिन दशरथ जैस्वाल (२५) या तरुणाची हत्या करून पळून गेलेल्या इम्रान निसार अन्सारी या आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. दुचाकी चोरीच्या संशयावरून इम्रानने सचिनची बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. बोरिवलीच्या गोराई परिसरात आकाश संपत गायकवाड हा राहत असून सचिन हा त्याचा मित्र आहे. दोन दिवसांपूर्वी आकाश व सचिन हे दोघेही मालवणी परिसरात गांजा खरेदीसाठी आले होते. काही वेळानंतर आकाश एका गल्लीत गेला तर सचिन हा दुचाकीजवळ उभा होता. काही वेळानंतर आकाश बाहेर आला असता त्याला सचिन बेशुद्धावस्थेत दिसला. चौकशीदरम्यान सचिन हा दुचाकी चोर असल्याच्या संशयावरून त्याला एका तरुणाने पकडून बेदम मारहाण केली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी आकाश गायकवाडच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी इम्रान अन्सारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सचिनची मारहाण करून हत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

इराणमध्ये नोकरी शोधताय? तर, सावधान! भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा