मुंबई : महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी एका खास कार्यक्रमात पालिकेच्या सफाई कामगारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणू घेतल्या. सफाई कर्मचाऱ्यांना कोणत्याही कारणाने नाहक त्रास दिल्यास संबंधित मुकादम, अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
मुकादम, पर्यवेक्षक आदींनी सफाई कर्मचाऱ्यांची काही चूक झाल्यास मेमो देण्याची कारवाई न करता त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे पी.टी. केस कर्मचाऱ्यांच्या समस्याही मार्गी लावाव्यात, असे निर्देश आयुक्त गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले. पालिकेतील वारसाहक्क/अनुकंपा प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत, या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी, असेही आदेश दिले.
आयुक्तांपुढे मांडल्या समस्या
सफाई कामगारांनी आपल्या समस्या आयुक्तांपुढे मांडल्या. सफाई काम करताना निकृष्ट दर्जाचे हॅण्डग्लोव्हज, मास्क आदी साहित्य वाटप केले जाते. सफाई कर्मचारी हक्काच्या घरापासून आजही वंचित आहेत. सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्यांना अनेक महिने त्यांची थकबाकी मिळत नाही. पालिकेत चपला झिजवाव्या लागतात. सफाई काम करताना, माती, धुळीचा त्रास होतो. रस्ते, पदपथावर वाहने पार्क केल्यामुळे तसेच भंगार वाहने उभी ठेवल्याने, रस्त्यावर फांद्या पडल्याने, फेरीवाल्यांचे बस्तान आदी कारणांमुळे तेथे साफसफाई करण्यात अडचण येत असल्याच्या तक्रारी कामगारांनी केल्या.