मुंबई

आरेतील रस्त्याबाबत कारवाईची तिहेरी कुऱ्हाड; निकृष्ट काम हटवून पुन्हा करण्याचा कंत्राटदाराला आदेश, पालिका अभियंत्‍यांना लेखी सक्त ताकीद

गोरेगावच्या आरे वसाहतीत मुख्‍य रस्‍त्‍याचे काँक्रीटीकरणाचे काम निकृष्टपणे होत असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आल्यानंतर प्रशासनाने याप्रकरणी कठोर कारवाईची तिहेरी कुऱ्हाड चालविली आहे.

Swapnil S

मुंबई - गोरेगावच्या आरे वसाहतीत मुख्‍य रस्‍त्‍याचे काँक्रीटीकरणाचे काम निकृष्टपणे होत असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आल्यानंतर प्रशासनाने याप्रकरणी कठोर कारवाईची तिहेरी कुऱ्हाड चालविली आहे. कंत्राटदाराबरोबरच गुणवत्‍ता देखरेख संस्‍था आणि पालिकेच्या संबधित अभियंत्यावर हा घाव बसला आहे.

कंत्राटदारावर दंडात्‍मक कारवाईबरोबरच त्याने स्‍वखर्चाने काँक्रीट रस्‍त्‍याचा बाधित भाग पुन्हा नव्याने तयार करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, रस्‍ते कामात पुन्‍हा त्रुटी केल्‍यास दुप्‍पट दंड आकारण्‍याचा तसेच, तिसऱ्यांदा त्रुटी केल्‍यास काळ्या यादीत टाकण्‍याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.

महानगरपालिकेने सर्व रस्‍त्‍यांचे टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सिमेंट काँक्रीटीकरण करण्‍याचे धोरण आखले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे रस्ते कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेत आहेत. गोरेगाव-आरे वसाहतीतील मुख्‍य रस्‍त्‍याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्‍यासाठी कंत्राटदारासह गुणवत्‍ता देखरेख संस्‍थेची नेमणूक करण्‍यात आली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी प्रत्‍यक्ष भेट देत या रस्‍ते कामाची नुकतीच पाहणी केली.

आरे वसाहत मुख्य रस्ता (दिनकरराव देसाई मार्ग) अंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गापासून मोरारजी नगरपर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण आणि इतर ठिकाणांची बांगर यांनी पाहणी केली होती. त्‍यावेळी सिमेंट काँक्रिट रस्‍ते कामातील त्रुटी निदर्शनास आल्‍या. काही ठिकाणी काँक्रीट रस्‍त्‍यांना मोठ्या, तर काही ठिकाणी किरकोळ भेगा पडल्‍याचे, तडे गेल्‍याचे, तर काही ठिकाणचा पृष्‍ठभाग जीर्ण झाल्‍याचे, पोत न राखल्‍याचे आढळले होते. या कामात कोणत्‍याही उणिवा राहणार नाहीत, यासाठी अधिक दक्ष, सजग राहून कामकाज करावे, अशी लेखी समज संबंधित अभियंत्यांना देण्‍यात आली आहे.

"महानगरपालिकेच्या रस्ते कामांमध्ये अत्युच्च गुणवत्ता राखली जावी, यासाठी प्रशासन दक्ष आहे. कमी गुणवत्तेची कामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. तसेच त्यावर दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त अधिक तीव्र कारवाई केली जाऊ शकते, याची कंत्राटदारांनी दखल घेणे गरजेचे आहे. गुणवत्ता देखरेख संस्था यांना महानगरपालिका नियुक्त करते. रस्ते कामांची गुणवत्ता राखली जावी, हा त्यामागचा उद्देश असून त्यांना महानगरपालिका स्वतंत्र रक्कम अदा करते. जर निकृष्ट काम झाले तर, कंत्राटदारांसोबतच गुणवत्ता देखरेख संस्थांनाही तेवढेच जबाबदार धरले जाईल." - अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प)

भविष्यात पुन्हा त्रुटी आढळल्यास दुप्पट दंड :

कंत्राटदाराने तडे गेलेले, पोत न राखलेले आणि काँक्रीट पृष्ठभागावर दोष आढळलेले भाग तातडीने काढावेत. ते भाग नव्याने तयार करावेत. यात नजीकच्या पटलांचाही (पॅनेल) समावेश करावा. प्रारंभिक त्रुटींमुळे झालेल्या खर्चाच्या रकमेचा तसेच त्याच्या समतुल्य दंडाची कपात कंत्राटदाराच्‍या देयकामधून करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी पुन्हा आढळल्यास, दुप्पट दंडाची आकारणी करण्‍यात येईल. तिसऱ्यांदा त्रुटी आढळल्यास, भविष्यात महानगरपालिकेच्‍या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास अपात्र ठरविण्यात येईल, असा सक्‍त इशारा देण्‍यात आला आहे.

गुणवत्ता देखरेख संस्थेस देखील दंड :

गुणवत्ता देखरेख संस्था ही कंत्राटदाराकडून निविदेतील अटी-शर्तींनुसार गुणवत्तापूर्ण कामे करवून घेण्यास अपयशी ठरली आहे. त्यामुळे गुणवत्ता देखरेख संस्थेस देखील दंड आकारण्यात आला आहे. रस्त्याचा बाधित भाग नव्याने करण्यासाठी येणारा खर्च व त्याच्या समतुल्य दंडाची रक्कम गुणवत्ता देखरेख संस्थेकडून वसूल केली जाणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी पुन्हा आढळल्यास, दुप्पट दंडाची आकारणी करण्‍यात येईल. तिसऱ्यांदा त्रुटी आढळल्यास, भविष्यात महानगरपालिकेच्‍या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास अपात्र ठरविण्यात येईल.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी