मुंबई

कांजूरमार्गची उरलेली जागा कुणाच्या घशात? आदित्य ठाकरेंचा सवाल

मेट्रो कारशेडवरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

प्रतिनिधी

शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी मेट्रो-६ साठीच्या कारशेडसाठी देण्यात येणाऱ्या जागेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कांजूरमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो-६ कारशेडसाठी दिली जाणार आहे. मग, उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, “महसूल खात्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना मेट्रो-६ साठी कांजूरमार्गची १५ हेक्टर जागा ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही अडीच वर्षे बोलत आलो आहोत, मेट्रो-६ साठी कारशेड गरजेचं आहे. कारशेडविना २०१८ साली कंत्राट काढण्यात आलं होतं. नंतर कारशेड बनवणार कुठे हा प्रश्न होता.”

“२०२१ साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील कारशेड कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरमध्ये हलवलं. ४४ हेक्टरमध्ये मेट्रो ३,६,४,१४ या चार लाइन्सचे कारशेड एकत्र करणार होतो. यामागे जनतेचे आणि महाराष्ट्राचे पैसे वाचावेत हा एकच हेतू होता. चार कारशेड एकत्र केल्याने महाराष्ट्राचे १० हजार कोटी रुपये आणि वेळ वाचला असता. मेट्रो-३ आणि ६ ही लाइन मुंबई तर ४ आणि १४ ही लाइन ‘एमएमआरडीए’ परिसरातील होती. या चारही लाइन कांजूरमार्गमध्ये आल्याने ते केंद्र बनलं असते,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

“मेट्रो लाइन ३ चे कारशेड आरेत, तर ६ चे कारशेड कांजूरमार्ग येथे नेण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मेट्रो लाईन ४ आणि १४ हे ‘एमएमआरडीए’ला जोडणार आहेत. या दोन्हींचे कारशेड ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे यात घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा किती हात होता माहिती नाही. पण, कारशेडसाठी जागांचं हस्तांतरीत होणार आहे, यात कोणाची मध्यस्थी आहे का? कोणाच्या नावावर सातबारे आहेत? कोणत्या जमिनी घेणार आहेत? कोणाच्या मतदारसंघात जमिनी घेणार आहेत? हे सगळे प्रश्न येतात”, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी