मुंबई : किशोरवयीन मुलांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर करण्यावर भर दिला जात असून त्यावरील अवलंबीत्व वाढले आहे. चाईल्ड राईटस् ॲड यू (क्राय) या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. 'टिंग टांग! पॉज, बिफोर डूइंग एनिथिंग ऑनलाईन' या मोहिमेचा भाग असून मुलांसाठी सुरक्षित डिजिटल जागा तयार करण्याचा प्रयत्न आहे.
देशातील ११.३ कोटींहून अधिक मुले शिकण्यासाठी, खेळण्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी इंटरनेटचा वापर करत असताना क्रायची ही राष्ट्रीय मोहीम सुरक्षित डिजिटल वर्तणूक तसेच मजबूत संरक्षण निर्माण करण्यात मदत करण्यापूर्वी विराम घेण्यास प्रोत्साहित करते.
मुले एआयला एक शक्तिशाली शिक्षण साहाय्यक म्हणून स्वीकारत आहेत. परंतु तंत्रज्ञान मानवी विचार, सर्जनशीलता आणि निर्णयाची जागा एआय घेऊ शकत नाही, याची जाणीवही मुलांना आहे.क्रिअन रबाडी, रिजनल डायरेक्टर, क्राय वेस्ट
५,२५७ विद्यार्थ्यांचा सहभाग
या विश्लेषणामध्ये ५,२५७ सहभागींच्या प्रतिसादांचा समावेश होता. या सर्वेक्षणात ५९.७ टक्के मुली आणि ३८.५ टक्के मुले सहभागी झाली होते. सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६७.७ टक्के १५ वर्षे वयोगटातील होते, तर २०.४ टक्के १३-१४ वर्षे वयोगटातील आणि १० ते १२ वर्षे वयोगटातील १२ टक्के मुले होती.
चॅटजीपीटीला पसंती
चॅटजीपीटी हे आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे एआय साधन म्हणून उदयाला आले आहे. ५ हजार प्रतिसादकर्त्यांनी ते वापरले असल्याचे सांगितले. मात्र, केवळ ४.१ टक्के जणांनी त्यांनी जनरेटिव्ह एआयबद्दल ऐकलेले नसल्याचे सांगितले.
सकारात्मक परिणाम
विद्यार्थ्यांनी शिक्षणावर एआयचा सकारात्मक परिणाम नोंदवला. ५३ टक्के मुलांनी सांगितले, एआयच्या परिचयानंतर शिक्षणात किंचित सुधारणा झाली तर २६ टक्के मुलांनी त्यांच्या शिक्षणात मोठा फरक नोंदवला. २० टक्के जणांनी हा बदल नगण्य असल्याचे सांगितले.