मुंबई

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

नगरसेविका म्हणून आपल्या पदाच्या जोरावर मिळवलेले सर्व लाभ आणि मानधन त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे. याव्यतिरिक्त, जात प्रमाणपत्र रद्द केल्याची नोंद अधिकृत दप्तरांमध्ये करावी आणि त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जात प्रमाणपत्र समितीने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांसह संबंधित विभागाला दिले आहेत.

Krantee V. Kale

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच एमआयएमचे आठ नगरसेवक विजयी झाले. मात्र आता मानखुर्द शिवाजीनगर येथील प्रभाग क्रमांक १३८ मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन शेख यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. जात प्रमाणपत्र समितीच्या पडताळणीत कागदपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने रोशन शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १३८ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले सपाचे पराभूत उमेदवार महफूज आझमी यांनी नगरसेवकपद मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत, प्रभाग क्रमांक १३८ हा ‘इतर मागासवर्गीय’ (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव होता; याच प्रभागातून रोशन शेख यांनी विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर, दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार महफूज आझमी यांनी रोशन शेख यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिले. त्यामुळे हे प्रकरण परभणी येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वर्ग करण्यात आले. तपासणीदरम्यान, रोशन शेख यांनी कागदपत्रे सादर करताना ज्या व्यक्तींचा उल्लेख आपले नातेवाईक म्हणून केला आहे, त्या व्यक्तींचा त्यांच्याशी प्रत्यक्षात कोणताही संबंध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रोशन शेख यांचे सगळे दावे खोटे फोल ठरले.

कागदपत्रांची सखोल तपासणी, लेखी व युक्तिवाद, न्यायालयीन निवाडे आणि दक्षता पथकाने सादर केलेला अहवाल या सर्वांचा विचार केल्यानंतर, रोशन शेख यांचा ‘जुलाहा’ (ओबीसी) प्रवर्गात समावेश असल्याचा दावा सिद्ध होऊ शकत नाही, असा निष्कर्ष समितीने काढला. अखेर जातपडताळणी समितीने त्यांच्या नावे जारी करण्यात आलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवत तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व लाभ, मानधन वसूल करावे!

नगरसेविका म्हणून आपल्या पदाच्या जोरावर रोशन शेख यांनी मिळवलेले सर्व लाभ आणि मानधन त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे. याव्यतिरिक्त, जात प्रमाणपत्र रद्द केल्याची नोंद अधिकृत दप्तरांमध्ये करावी आणि त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जात प्रमाणपत्र समितीने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांसह संबंधित विभागाला दिले आहेत.

Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण

Mumbai : नालेसफाईच्या कामात तीन तेरा; मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात अपुरी यंत्रणा, सत्ताधारी पक्षाच्या पाहणी दौऱ्यात पोलखोल

रेल्वेच्या PRS प्रणालीमुळे बुकिंग क्षमतेत वाढ होणार; गर्दीच्या वेळेत वेग, विश्वासार्हता सुधारण्याचा प्रयत्न

Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात; प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवण्याची महसूल विभागाची तयारी