मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. बंगल्यात परवानगीशिवाय बांधकाम सुरू असल्याच्या आरोपावरून महापालिकेने काही भाग पाडल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी बांधकाम थांबवण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काम सुरूच राहिल्याचा महापालिकेचा दावा आहे.
बंगल्यात नेमकं कोणतं बांधकाम सुरू होतं?
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यात आवश्यक परवानग्या न घेता काही बदल करण्यात येत होते. यामध्ये बंगल्याच्या आतील रचनेत बदल करणे, नवीन भिंती उभारणे, खिडक्या बसवणे आणि इतर बांधकामांचा समावेश होता. हे काम नियमांचं उल्लंघन करून सुरू असल्याचा महापालिकेचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित बांधकामावर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
१० सप्टेंबरला बजावली होती नोटीस
मुंबई महापालिकेने १० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ३५४ अ अंतर्गत नोटीस बजावली होती. या नोटिशीत सुरू असलेलं बांधकाम तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसंच, बांधकामासाठी आवश्यक परवानग्या आणि संबंधित कागदपत्रं सादर करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, नोटीस मिळाल्यानंतरही काम थांबवण्यात आलं नाही, असा महापालिकेचा दावा आहे. त्यामुळे बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामाचा काही भाग पाडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
अजय देवगणच्या पीआर टीमने फेटाळलं वृत्त
दरम्यान, अजय देवगणचे जनसंपर्क प्रतिनिधी पराग देसाई यांनी दैनिक भास्करशी बोलताना या वृत्तावर स्पष्टीकरण दिलं आहे. अजय देवगणच्या राहत्या बंगल्यावर महापालिकेची कोणतीही टीम आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तिथे तोडक कारवाई झाल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, ज्या मालमत्तेबाबत कारवाईची चर्चा आहे, ती अजय देवगणच्या मालकीची असून त्याच्या राहत्या घरापासून काही अंतरावर आहे. ही मालमत्ता भाड्याने देण्यात आली आहे. तिथे काही अनियमितता आढळल्याने महापालिकेने कारवाई केली असण्याची शक्यता देसाई यांनी व्यक्त केली. या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.