संग्रहित छायाचित्र 
मुंबई

अजित पवारांनी फोडला सिंचन घोटाळ्याचा 'बॉम्ब'; मतदानाआधीच मित्रपक्षांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ

महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला एक दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील एका कथित सिंचन घोटाळ्याबाबत नवा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९ साली आली. मात्र, त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवून ठेवल्याचा आरोप अजित पवारांनी आता केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Swapnil S

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला एक दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील एका कथित सिंचन घोटाळ्याबाबत नवा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९ साली आली. मात्र, त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवून ठेवल्याचा आरोप अजित पवारांनी आता केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपयेच असल्याचे एका अधिकाऱ्याने कबूल केल्याचे अजित पवारांनी सांगितले. मात्र, राज्यात पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या त्यावेळच्या भाजप-शिवसेना युती सरकारने पार्टी फंडासाठी प्रकल्पाची किंमत १०० कोटींनी वाढवून मागितली. त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे १० कोटी जोडून २०० कोटींच्या प्रकल्पाची किंमत तब्बल ३१० कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. दरम्यान, त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खाते हे भाजपकडे होते. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या या आरोपानंतर जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी अनेक खुलासे केले आहेत. अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप शंभर टक्के खरे आहेत, असे पांढरे यांनी सांगितले.

फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता!

अजित पवारांनी भाजपवर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार १९९९ला सत्तेवर आले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. ती पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम ३१० कोटी रुपये असल्याचे आढळून आली. मात्र, मी अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढविल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपयेच असल्याचे त्या अधिकाऱ्याने कबूल केले. पुढे त्या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, १०० कोटी रुपये तेव्हा पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनीदेखील त्यामध्ये आमचे १० कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी झाली. ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता’, असा दावा अजित पवारांनी केला आहे.

पुरंदर जलसिंचन योजनेवर झाले ३९३ कोटी खर्च

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती आणि दौंड या दुष्काळी तालुक्यांतील शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी १९९३ साली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेच्याअंतर्गत मुळा आणि मुठा नदीतील चार टीएमसी पाणी पंपांच्या सहाय्याने लिफ्ट करुन पाईपलाईनद्वारे दुष्काळी तालुक्यांना देण्यास मान्यता मिळाली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ६३ गावांतील २५,४९८ हेक्टर शेतीला फायदा होईल, असे सांगण्यात आले. अजित पवारांनी केलेल्या दाव्यानुसार १९९६ ला या प्रकल्पासाठी युती सरकारने ३३० कोटी खर्च करण्यास मान्यता दिली होती. मात्र १९९९ ला सत्ताबदल झाला आणि नंतर आलेल्या कँाग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये अजित पवार हे जलसंपदा मंत्री बनले. तेव्हा त्यांना या योजनेचा खर्च वाढविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता पार्टी फंडासाठी १०० कोटी, तर अधिकाऱ्यांनी १० कोटी वाढविल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी वेळोवेळी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत या प्रकल्पासाठी ३९३ कोटी रुपये खर्च झाला असून उरलेल्या कामांसाठी आणखी निधीची मागणी करण्यात आली आहे. ही योजना २००६ पासून कार्यान्वित आहे.

सत्ताधारी-विरोधक सगळेच चोर - पांढरे

‘अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप शंभर टक्के खरे आहेत. अजित पवार हे त्यांच्या खात्यातील भ्रष्टाचाराची कबुली देत आहेत. कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत अनेक मोठमोठ्या उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. त्यामध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. आता हे १०० कोटी रुपयांची माहिती देताहेत. मात्र, प्रत्यक्षात सगळ्या योजना मिळून हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे’, असा खळबळजनक दावा जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केला. अजित पवार आरोप करत असले, तरी या सगळ्या छोट्या-मोठ्या भ्रष्टाचाराचा कळस अजित पवारांनीच केला आहे. अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळे अधिकाऱ्याचे नाव त्यांनी घेतलेले नाही, असा आरोपही पांढरे यांनी केला. सत्ताधारी आणि विरोधक सगळेच चोर आहेत. यासंदर्भात मी अनेक पत्रे यापूर्वीही सरकारला लिहिली आहेत. अजित पवारांच्या शेजारी बसून भाजप फसले आणि हा राजकारणाचाच भाग आहे. या विभागाचे अधिकारी हे मंत्र्यांना स्कीम देतात आणि सांगतात की, ही योजना राबवली की कसे हजारो कोटी तुम्ही कमवू शकता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही - मुख्यमंत्री

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ऐन महापालिका निवडणुका सुरू असताना एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ‘अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. त्यानंतर आता महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला. अजित पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती, असे ते म्हणाले.

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार