मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू असून सीआयडीने देखील याबाबत माहिती दिली आहे. तर दुसरीकडे ज्या कंपनीच्या विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले, त्या ‘व्हीएसआर’ कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. रोहित यांनी शुक्रवारी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ सभागृहात भेट घेतली. त्याआधी रोहित यांनी सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत सविस्तर चर्चा केली. तत्पूर्वी, गुरुवारी त्यांनी युगेंद्र पवार आणि कार्यकर्त्यांसह बारामती पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, पोलिसांनी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आमदार, मंत्री आणि दिग्गज नेते विधिमंडळातच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने लावून धरला आहे. रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे कारण हे आहे की, माझ्या आणि महाराष्ट्रातील सर्वांच्या मनात ज्या शंका आहेत, त्या शंका घेऊन मी मुख्यमंत्र्यांपुढे बाजू मांडली. सगळे रिसर्च पेपर आणि कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत, ती सर्व मी मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. केंद्रातही भाजपचे सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री किंवा वरिष्ठ नेते असतील त्यांच्याकडेही बाजू मांडावी. या चौकशीत पारदर्शकता यावी, अशी मागणी मी फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, आणखी काही कागदपत्रांची मागणी त्यांनी माझ्याकडे केली, ती कागदपत्रे घेऊन ते गृहमंत्री अमित शहा यांना भेटतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गुन्हा दखल करण्याबाबत काही पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करुन त्यातील तांत्रिक अडचणी काय आहेत हे समजून घेतो’.
सोमवारी पत्रकार परिषदेत आणखी गौप्यस्फोट करणार
केंद्र सरकारकडून उद्या शनिवारपर्यंत अपघाताबाबतचा अहवाल येईल, अशी अपेक्षा आहे. ‘थातूरमाथुर अहवाल देऊ नका, डिटेल्समध्ये आम्हाला अहवाल हवा आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आणखी काही गोष्टी समोर आणणार आहे’, असेही रोहित पवार यांनी सांगितले. बारामतीमध्ये गुन्हा दाखल व्हावा अशी इच्छा होती, तिथे खूप गर्दी होईल म्हणून मी प्रथम मरीन ड्राईव्हला गेलो. नवीन कायद्यानुसार ‘झिरो एफआयआर’ हा बीएनएस कायद्यांतर्गत व्हावी, अशी इच्छा होती. पण तिथे गुन्हा दाखल झाला नाही, म्हणून साहजिकच जिथे घटना झाली तिथे बारामतीला जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर, सीआयडीमध्ये गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
‘देवगिरी’ बंगल्यावर स्मारक व्हावे...
दिवंगत अजित पवार हे गेल्या २२ वर्षांपासून मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर राहात होते, या ठिकाणी अजितदादाचे स्मारक असावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विधानभवन परिसरातही दादांचे स्मारक व्हावे, बारामती विमानतळावर नाईट लँडिंग व्हावी, विमानतळ अत्याधुनिक व्हावे, या विमानतळाला अजितदादांचे नाव द्यावे, अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. तर, पुण्याच्या रिंग रोडलाही अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सुदीप जाधव यांच्या पत्नीला नोकरीत कायम करावे
विमानात अजितदादांसोबत सुरक्षा रक्षक सुदीप जाधव यांचाही मृत्यू झाला, त्यांच्या पत्नी ठाणे महापलिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर आहेत, त्यांना पर्मनंट करावे, अशी विनंतीही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.