मुंबई : रायगड किल्ल्यावर १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांना डावलत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी दिली. त्यानंतर दादर येथील चैत्यभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणापासून दूर ठेवण्यात आल्याने महायुतीतील धुसफूस समोर आली. मात्र या सगळ्या चर्चावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडदा टाकला आहे. यापुढे कुठल्याही कार्यक्रमात आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री दोन दोन मिनिटं बोलणार, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त १२ एप्रिल रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात मोजकीच भाषणं असल्यामुळे यादीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं नव्हती, मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी मिळाली तर अजित पवार यांचे भाषण झाले नाही. यानंतर सोमवारी १४ एप्रिल चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडला. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही भाषणे होणार होती. मात्र दोन्ही नेत्यांना भाषणाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे., कार्यक्रमात बोलण्याची संधी न मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, यासंदर्भामध्ये कारण नसताना फुटकची चर्चा सुरू आहे.