मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर मंगळवारी जनसागर लोटला. देशभरातील आंबेडकरी अनुयायांनी रांगेतून शिस्तबद्धपणे आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले. राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क मैदान आणि चैत्यभूमी परिसरात अलोट गर्दी उसळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात. मंगळवारी आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर सकाळपासूनच गर्दी होऊ लागली होती. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. रांगेमधून अनुयायांना चैत्यभूमीमध्ये सोडण्यात येत होते. रणरणत्या उन्हातही अनुयायी रांगांमध्ये थांबून होते. पोलीस आणि समता सैनिक दलाच्या जवानांनी अनुयायांना चैत्यभूमीत रांगेमधून पाठवण्यासाठी नियोजन केले.
सकाळी राज्य सरकारच्यावतीने चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी अनुयायांनी बाबासाहेबांचा जयघोष केला. दुपारनंतर अभिवादनासाठी गर्दी होऊ लागली. विशेषत: उत्तर भारतीय आणि बिहार राज्यातील अनुयायी कुटुंबासह अभिवादनाच्या रांगेत उभे होते. त्याचप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागातून आलेले अनुयायीही येथे दाखल झाले होते. सुमारे एक ते दीड तास रांगेत उभे राहून अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता आले. मोठ्या संख्येने आलेल्या अनुयायांसाठी काही सामाजिक संस्थांकडून जेवण, पाणीवाटप करण्यात येत होते. रणरणत्या उन्हामध्येही अनुयायांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच लगतच्या परिसरामध्ये नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, सीसीटीव्ही, अग्निशमन दल सुसज्ज ठेवण्यात आले होते. तसेच आणीबाणीच्या प्रसंगी तत्काळ मदतीसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या.
मुंबईत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील आंबेडकरीबहुल विभागांमध्ये १३ तारखेच्या रात्रीपासूनच जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळपासून महापुरुषांच्या गीतांचे कार्यक्रम, विविध उपक्रम राबवून महामानवाला अभिवादन करण्यात आले, तर सायंकाळी वस्त्यां-वसाहतींमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई व भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
विविध कार्यक्रमांची रेलचेल
जयंतीनिमित्त मुंबईतील विविध भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत होती. राजकीय पक्ष, संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या परीने जयंती साजरी करण्यात आली. काही संस्थांनी लक्षवेधी देखावे साकारले. १३ एप्रिलच्या रात्री फटाके फोडून अनुयायांनी जयंती उत्सव सुरू केला. सकाळी महापुरुषांच्या गीतांचे कार्यक्रम, परिसंवाद, जलसे, रक्तदान, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि अन्नदान करून अनुयायांनी जयंती साजरी केली.
मुंबईच्या विविध भागात भव्य मिरवणुका
सायंकाळी भव्य मिरवणुका मुंबईतील मोठे आकर्षण ठरले. बाबासाहेब आणि तथागत बुद्धाच्या प्रतिमांच्या मिरवणुकांनी संध्याकाळी शहर आणि उपनगरातील रस्ते गजबजले होते. चेंबूर येथील पी.एल. लोखंडे मार्ग, वरळी, नायगाव बीडीडी चाळ, माटुंगा लेबर कॅम्प, विक्रोळी, सायन कोळीवाडा, भांडूप, मुलुंड, मानखुर्द, गोवंडी, कांदिवली, गोरेगाव, वाशीनाका, पांजरापोळ, रमाबाई आंबेडकर नगर, भायखळा, घाटकोपर, माझगाव, कुलाबा कफ परेड आदी भागात मिरवणुका काढण्यात आल्या.
वस्त्या निळ्या झेंड्यांनी सजल्या
शुभ्र वस्त्र परिधान केलेले अनुयायी, निळे झेंडे आणि पंचशीलेच्या झेंड्यांनी वस्त्या सजल्या होत्या. विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्थांच्या कार्यकर्त्यांनी महामानवाला वंदन केले. ठिकठिकाणी निघालेल्या मिरवणुका, विविध कार्यक्रम, घोषणांनी परिसर दणाणून गेला. बुद्धविहार आणि परिसर विद्युत रोषणाई, फुलांनी सजला होता.