मुंबई : भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही. महाराष्ट्रात भाजप स्वबळावर मार्गक्रमण करीत आहे, असे जाहीर करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांसह मित्रपक्षांना सूचक इशारा दिला.
चर्चगेट येथील भाजपच्या नवीन प्रदेश कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, भाजप पक्षाची स्थापना झाल्यापासून छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे की भाजपचे कार्यालय हे मंदिर आहे. कार्यालयात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाते. बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल. मात्र, भाजपसाठी कार्यालय म्हणजे मंदिरच आहे.
आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे नीती घडवली. भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला. आता भाजप कुठल्याही कुबड्यांचा आधार न घेता मार्गक्रमण करत आहे. भाजप स्वबळावर उभा आहे. ५५ हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्षांसोबत येथे मुख्यमंत्र्यांचे देखील कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. महाराष्ट्र भाजपने आपल्या परंपरा लक्षात ठेवल्या आहेत, असेही अमित शहा म्हणाले.
या इमारतीत बहुमजली पार्किंग असेल, असे सांगत शहा म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे की, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी तीन-चार खोल्या निवासासाठी ठेवा.
भाजप नेत्याने १८ वर्षे देशाचे नेतृत्व केले ही अभिमानाची बाब!
अटलजी बोलले होते की, ‘कमल खिलेगा’, तेव्हा पहिले पंतप्रधान अटलजी झाले. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत १८ वर्षे देशाचे नेतृत्व भाजपच्या नेत्यांनी केले आहे आणि ही भाजपसाठी अभिमानाची बाब आहे, असे शहा यांनी नमूद केले.
भाजपच्या यशाचे श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रम, त्याग आणि निष्ठेला आहे. या कार्यकर्त्यांनी पेरलेल्या बीजांमुळेच भाजप आज वटवृक्ष बनला आहे. भाजप हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून मेहनती, कार्यक्षम आणि कामगिरीच्या आधारावर पुढे जाणारे कार्यकर्ते पक्षात वरच्या पदावर पोहोचू शकतात, असे त्यांनी सांगितले.
मी बूथ अध्यक्ष होतो आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब घरातील असूनही त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळे तीन वेळा देशाचे नेतृत्व करत आहेत, असे शहा म्हणाले.
जनसंघाच्या काळापासूनच विचारसरणीवर आधारित राजकारण आणि लोककल्याण हे भाजपचे वैशिष्ट्य राहिले आहे. एका गरीब चहावाल्याचा मुलगा तीन वेळा पंतप्रधान होतो. यातून लोकशाहीवर आमचा विश्वास किती दृढ आहे? हे त्याचे उदाहरण आहे. ज्यांच्या पक्षात लोकशाही पद्धतीने निवड होत नाही, तिथे लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
विरोधकांचा सुपडा साफ करा!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा असा सुपडा साफ करा की ते दुर्बिण लावूनही सापडणार नाहीत, असे सांगत शहा यांनी आगामी पालिका निवडणुकीचे रणशिंग यावेळी फुंकले.
राज्यात आज भाजप पहिल्या क्रमांकावर
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शहा म्हणाले, २०१४ मध्ये आम्ही सन्मानजनक जागावाटपाची मागणी केली होती, पण युती तुटली. आम्ही बऱ्याच वर्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढलो आणि सर्वात मोठा पक्ष बनलो. एकेकाळी आम्ही राज्याच्या राजकारणात चौथ्या क्रमांकावर होतो, पण आज आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत, असे शहा यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे कार्यालय हवे
डिसेंबर २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत भाजपचे कार्यालय हवे, अशी विनंती मी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना करतो, असे आवाहन यावेळी अमित शहा यांनी फडणवीस यांना केले.