तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था  
मुंबई

तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था

पश्चिम बंगालमधील इक्बाल दिवस-रात्र तलावाच्या पाण्यात राहत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पाण्याबाहेर आल्यानंतर अंगाचा असह्य दाह होत असल्याने तो पुन्हा पाण्यात जात असे.

Mayuri Gawade

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील इक्बाल नावाचा किशोरवयीन मुलगा गेल्या काही काळापासून बहुतांश वेळ तलावाच्या पाण्यातच घालवत होता. पाण्याबाहेर आल्यानंतर संपूर्ण शरीरात असह्य जळजळ होत असल्याचं तो सांगत होता. त्याचा तलावात बसून खातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची परिस्थिती समोर आली. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी त्याच्या उपचारासाठी पुढाकार घेतला असून, इक्बालला एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आलं आहे.

पाण्याबाहेर येताच होतो दाह

मुर्शिदाबादच्या बेलडांगा परिसरात राहणारा इक्बाल दिवस-रात्र तलावाच्या पाण्यात राहत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पाण्याबाहेर आल्यानंतर अंगाचा असह्य दाह होत असल्याने तो पुन्हा पाण्यात जात असे. काही वेळा तो एका तलावातून दुसऱ्या तलावातही जात असल्याचं सांगण्यात आलं.

'एएनआय'च्या वृत्तानुसार इक्बालने आपल्यावर एखाद्या अदृश्य- अलौकिक शक्तीचा प्रभाव असल्यासारखं वाटत असल्याचंही कुटुंबीयांना सांगितलं. मात्र, त्याला नेमका कोणता त्रास आहे आणि पाण्याबाहेर आल्यानंतर दाह का होतो, यामागचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तलावात बसून खातानाचा व्हिडीओ व्हायरल

अलिकडेच इक्बाल तलावात बसूनच खाद्यपदार्थ खात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे इक्बालच्या परिस्थितीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्याची ही अवस्था अनंत अंबानी यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी त्याच्या उपचारासाठी मदतीचा पुढाकार घेतला.

अनंत अंबानींचा मदतीसाठी पुढाकार

अनंत अंबानी यांच्या पुढाकाराने इक्बालला पश्चिम बंगालमधून एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आलं. सध्या त्याला सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्या आवश्यक तपासण्या सुरू आहेत.

याआधीही इक्बालच्या पालकांनी त्याला स्थानिक रुग्णालयात नेलं होतं. मात्र, उपचारांनंतरही त्याची प्रकृती अपेक्षेप्रमाणे सुधारली नाही. दीर्घकाळ उपचार करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने कुटुंबाने मदतीचे आवाहन केले होते.

सतत पाण्यात राहणंही धोकादायक

दरम्यान, त्वचाविकारतज्ज्ञांनी दीर्घकाळ पाण्यात राहण्यामुळे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. सतत पाण्यात राहिल्याने त्वचा अतिशय मऊ आणि फिकट होऊ शकते. या अवस्थेला 'स्कीन मॅसरेशन' (skin maceration) असे म्हटले जाते. त्यामुळे त्वचेवर भेगा पडणे, जळजळ होणे आणि संसर्गातचा धोका वाढू शकतो. तसेच सततच्या ओलाव्यामुळे बुरशीजन्य आणि जिवाणू संसर्गाचाही धोका वाढतो. त्यामुळे इक्वाबालच्या या त्रासामागचं नेमकं वैद्यकीय कारण शोधणं महत्त्वाचं आहे.

मुंबईतील डॉक्टरांकडून कारणांचा शोध

इक्बाल पाण्याबाहेर आल्यानंतर नेमका दाह का होतो, याचा शोध आता मुंबईतील डॉक्टर घेत आहेत. हा त्रास त्वचेशी संबंधित आहे, की अन्य कोणत्या वैद्यकीय कारणामुळे होतो, यासाठी त्याच्या विविध तपासण्या केल्या जात आहेत. तपासण्यांचे निष्कर्ष आल्यानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया