मुंबई

... आणि आम्ही वाघऐवजी मशाल निवडली - छगन भुजबळ

शिवसेना ही मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी स्थापन करण्यात आली होती.

संजय जोग

“प्रचारादरम्यान भिंतींवर ‘मशाल’ रंगवणे सोपे असल्यामुळे मी हे चिन्ह निवडले होते. आम्ही वाघ हे चिन्ह निवडण्याचा विचार करत होतो, पण त्याकाळी निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणतीही अत्याधुनिक साधने उपलब्ध नसल्यामुळे आणि मतदारांपर्यंत ‘वाघ’ हे चिन्ह पोहोचवणे कठीण होते. आम्ही ‘मशाल’ घेऊन मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदारांनाही हे चिन्ह आवडल्यामुळे मी माझगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो”, असे सांगत शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे नेते छगन भुजबळ यांनी नवशक्तिशी  खास बातचीत करताना इतिहासाला उजाळा दिला.

“शिवसेना ही मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरू, याचीही कल्पना आम्हाला नव्हती. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष नसल्याने पक्षाकडे कोणतेही अधिकृत चिन्ह नव्हते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हत्येनंतर १९८५ ला शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. त्यावेळी शिवसेनेचे अनेक उमेदवार बॅट आणि बॉल या चिन्हावर निवडणूक लढले. त्यावेळी मी मशाल हे चिन्ह निवडले आणि मी निवडून आलो.”, असे भुजबळ यांनी सांगितले.

आगामी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे काय होईल, असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, “या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे कठीण जाणार नाही. शिवसेना अंधेरी पूर्वची जागा सहजपणे जिंकेल, असे मला वाटते.”

शिवसेना संपणार नाही, पण मला अतीव दु:ख !

४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना संपली, असे म्हटले जात आहे. शिंदे गटाकडून ‘शिल्लक सेना’ म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र शिवसेना ही तळागाळात पोहोचल्यामुळे राज्याच्या गावागावात शिवसैनिक असल्यामुळे शिवसेनेच्या कठीण काळातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे अस्तित्व दिसून येईल. उद्धव ठाकरे गटाला मिळालेला मशाल हे चिन्ह याआधीच राज्यभर पोहोचले आहे. आता उद्धव ठाकरे हे पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळवून देतील, असा ठाम विश्वास मला आहे. मात्र या वादात शिवसेनेचे नुकसान होत असल्याचे पाहून मला अतीव दु:ख होत आहे,” असेही भुजबळ यांनी सांगितले.

मशालीवर आले होते ७० नगरसेवक निवडून

"माझ्या विजयानंतरच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी मशाल चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचे ७० नगरसेवक निवडून आले आणि बाळासाहेबांनी मला महापौरपदी बसवण्याचा निर्णय घेतला. १९८९ मध्ये शिवसेनेची अधिकृतपणे प्रादेशिक पक्ष म्हणून नोंदणी झाल्यानंतर आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले, ते आजपर्यंत शिवसेनेचे अधिकृत चिन्ह होते.”, असे भुजबळ यांनी सांगितले.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध