मुंबई

अनिल देसाईंनी विश्वास सार्थ ठरवला, विद्यमान खासदार राहुल शेवाळेंवर मात

Swapnil S

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव केला. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या अनिल देसाई यांनी शेवाळे यांना तब्बल ५३ हजार ३८४ मतांनी पराभूत करत उद्धव ठाकरेंनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.

अनिल देसाई यांना ३ लाख ९५ हजार १३८ मते मिळाली, तर राहुल शेवाळे याना ३ लाख ४१ हजार ७५४ मते मिळाली. मतमोजणीत सुरुवातीचे कल हे राहुल शेवाळे यांच्या बाजूने होते. त्यानंतर मात्र अनिल देसाई यांनी आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत टिकवत त्यांनी ५३ हजारांनी बाजी मारली. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात यावेळी ५३.६० टक्के मतदान झाले होते. २०२९ साली हेच मतदान ५५.०२ टक्के इतके झाले होते. म्हणजेच यावेळी जवळपास दीड टक्के मतदान कमी झाले आहे. विशेष म्हणजे धारावी विधानसभा सोडता, सर्वच विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले आहे.

राहुल शेवाळे यांना धारावीत घटलेली मतदानाची टक्केवारी पराभवाला कारणीभूत ठरली, असे बोलले जाते. वास्तविक पाहता, सायन व धारावी मतदारसंघात झालेले जास्त मतदान हे कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता होती. भाजपला बहुमत मिळाल्यास संविधान बदलणार, हा प्रचार मतदारसंघातील दलित मतदारांच्या मनावर बिंबवण्यात ठाकरे गट यशस्वी ठरला. माहीम मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि मनसे यांची संमिश्र ताकद होती. मनसेची ताकद पाठीशी असताना व माहीम येथील मतदानाचा टक्का वाढला असताना तसेच अणुशक्ती नगर, वडाळा, धारावी, चेंबूर या विधानसभा मतदानसंघात राहुल शेवाळे यांच्या यशाची खात्री असताना राहुल शेवाळे यांचा पराभव महायुतीसाठी धक्कादायक ठरला आहे.

“लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च असते. जनतेने दिलेला हा कौल मला मान्य आहे. जनतेच्या मताचा आदर करतो. या मतदासंघातील जनतेने दोन वेळा माझ्यावर विश्वास दाखवून मला त्यांची सेवा करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी जनतेचा कायम ऋणी राहीन. यापुढे देखील जनतेची सेवा करत राहीन,” असे पराभवानंतर शेवाळे यांनी सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त