मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील फिल्मसिटीमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. ही आग प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’च्या सेटवर लागली.
अग्निशमन दलाचा चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनुपमा या सिरीयलचा सेट जळून खाक झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी सेटमधून धूर निघताना पाहिले आणि त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. आदल्या दिवशी रविवार असल्यामुळे ‘अनुपमा’च्या सेटवर शूटिंग बंद होते. सुदैवाने यामध्ये कुठल्याही जीवितहानी झाली नाही. मात्र सीरियलचा सेट जळून खाक झाला. दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांचे पथक दाखल झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या चार अग्निशमन गाड्या आणि जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाले. एक सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि तीन स्टेशन अधिकारी घटनास्थळी तैनात करण्यात आले.
सकाळी १०.१५ वाजेपर्यंत आग विझविण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.