पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी शासन दरबारी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक पर्यावरणप्रेमी संस्था देखील शासनाच्या खांद्याला खांदे लावून यासाठी पुढे आले आहेत. याचीच पोचपावती म्हणजे मागील काही वर्षांपासून अनेक परदेशी पक्ष्यांचा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उरण परिसरातील वाढलेला मुक्काम. तर दुसऱ्या बाजूला मान्सूनची चाहूल लागताच मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरात स्थलांतर झालेल्या विविध पक्ष्यांचे दर्शन होऊ लागले आहे. यामध्ये चातक, नवरंग, खंड्या (किंगफिशर) या स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश असून खाडी परिसरात पक्षीनिरीक्षकांची व निसर्गप्रेमींची या पक्ष्यांच्या दर्शनासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने हूल दिली असली तरी महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने बरसण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई, नवी मुंबईतही पावसाने काहीअंशी हजेरी लावली असतानाच स्थलांतर करून येणाऱ्या चातक आणि खंड्या (किंगफिशर) या पक्ष्यांचा खाडी, तलाव परिसरात वावर दिसून आल्याचे पक्षीप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेतून हजारो किमीचा प्रवास करून पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत दाखल होणारा चातक पक्षी मुंबई आणि परिसरात दृष्टीस पडू लागला आहे. यासोबत इतर वेळी मध्य प्रदेशात आढळणारा नवरंग किनारपट्टीवर पाऊस स्थिरावल्यानंतर मुंबईत दर्शन देतो. ठाणेसहीत अन्य भागात हे नवरंग दिसू लागले आहेत. दरम्यान, किंगफिशर आणि नवरंग हे पक्षी रात्रीच्या वेळेत स्थलांतर करतात. या दोन्ही पक्ष्यांचा मुक्काम समुद्र किनारा, खाडी परिसरात असतो. कित्येकदा प्रवासात हे पक्षी वाट चुकतात. धास्तावलेल्या या पक्ष्यांवर स्थानिक पक्ष्यांचे हल्ले होतात. कावळ्यांच्या हल्ल्यात नवरंग पक्षी जखमी झाल्याचे प्रकार मागील काही वर्षात अनेकवेळेस कानी आले आहेत. तर रात्रीच्या वेळेत प्रवास करत असताना खंड्या (किंगफिशर) इमारतींना आदळून जखमी होतात. मात्र, अशा घटना दुर्मीळ आहेत. सध्या पावसाच्या आल्हाददायक सरींचा आस्वाद घेण्यासाठी या पक्ष्यांनी मुंबईसहित अन्य भागात आपले बस्तान मांडले असून पक्षीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.