मुंबई : मलेरिया, डेंग्यू या आजारांचे सर्वेक्षण करणे, विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची माहिती गोळा करत ती आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देणे अशा कामांची जबाबदारी आशा सेविका पार पाडत असतात. रोज साधारणपणे ६ ते ७ तास काम करावे लागते. त्यात त्यांना मिळणारा मोबदला तुटपुंजा असून तोही वेळेवर मिळत नाही. तरीही आशा सेविका आपली जबाबदारी चोख बजावतात. मात्र त्यांना निवडणुकीच्या कामांत गुंतवल्यास कामाचा ताण येईल आणि दोन्ही कामे योग्य प्रकारे होणे शक्य नाही. त्यामुळे आशा सेविकांनी निवडणुकीच्या कामास नकार दिला असून तसे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आल्याचे आशा सेविका संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबई महानगरपालिका विभागांतर्गत काम करणाऱ्या एनएचएम आणि पालिका आशा अत्यंत महत्त्वाची व अत्यावश्यक सेवा देत असून तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करतात.
तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण देखील त्यांना वेळोवेळी करावे लागते. तसेच त्यांना आपल्या कुटुंबाची देखील जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे त्या आरोग्य सेवा व निवडणुकीचे काम ही दोन्ही कामे करू शकणार नाहीत.
अशा वेळी निवडणुकीसारख्या सेवेच्या मूळ कामावर विपरीत नैमित्तिक कामामध्ये त्यांना गुंतवल्यास त्यांच्या आरोग्य परिणाम होऊन मुंबईत साथीचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.