मुंबई : मुंबईत गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे अमली पदार्थांच्या सेवनामुळे दोन विद्यार्थी दगावल्याच्या घटनेनंतर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतल्याने ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या या कृतीला यश आले असून टिटवाळ्यात खूप मोठी कारवाई करून तब्बल ६ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एका महिला ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलच्या घरात हा मोठा साठा सापडला असून या महिलेबाबतची खळबळजनक माहिती हाती आली आहे. तिला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल अशी घटना उजेडात येत आहेत.
मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटर येथील कॉन्सर्टमध्ये जो प्रकार उघडकीस आला त्यामुळे एकच खळबळ उडाली. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरोधात जोरदार कारवाई सुरु केली असतानाच पोलीस एका हायप्रोफाईल सोसायटीत पोहोचले. येथे एका फ्लॅटमध्ये पोलिसांना तब्बल ५ हजार एक्टेंसीच्या गोळ्या मिळाल्या. या गोळ्यांची किंमत तब्बल ६ कोटी आहे. अश्विनी पॉल नावाच्या महिलेच्या घरात या सर्व गोळ्या सापडल्या. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून अधिक तपास केला असता अश्विनी पॉल या महिलेबाबत धक्कादायक माहिती हाती आली.अश्विनी पॉल आणि तिचा नवरा हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अश्विनीच्या घरातून चार ते पाच मोबाईल फोन आणि आठ सीम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
‘नेस्को’तील आरोपीचा संबंध आहे का? याचा तपास
विशेष म्हणजे एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा प्रकार या ड्रग्ज व्यवसायात सुरू होता. टिटवाळ्यात पोलिसांच्या छाप्यात सापडलेल्या ५ हजार एक्स्टेंसीच्या गोळ्यांपैकी काही गोळ्यांवर 'मर्सिडीज' असा उल्लेख आहे. तर नेस्कोच्या प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानी याच्या घरातून ज्या एक्स्टेंसीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या त्यांच्यावरही 'मर्सिडीज' असा उल्लेख आहे, अशीदेखील माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का? याचादेखील अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध सुरु आहे.
पोलीस अश्विनी पॉलपर्यंत कशी पोहोचली?
अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर युनिटने साकिनाका येथून इरफान अन्सारी याला एक्स्टेंसीच्या गोळ्यासह ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अश्विनी पॉलचे नाव समोर आले. त्यानंतर पोलीस अश्विनी पॉलच्या टिटवाळा येथील घरी पोहोचले. त्यांनी तिच्या घरावर अचानक छापा टाकला. या छाप्यात अश्विनी पॉलच्या घरात ५ हजार एक्स्टेंसीच्या गोळ्या सापडल्या. विशेष म्हणजे पोलिसांनी इरफान अन्सारी याला ड्रग्ज पुरणारा आरोपी सोफियान यालादेखील अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली.
पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला
अश्विनी पॉल ही सुफियान नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती. आरोपी इरफान आणि अश्विनी यांच्यातील दुवा म्हणून सोफियान काम करायचा. अश्विनी ही टिटवाळ्यातील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहत होती. सोफियानला बेड्या ठोकल्यानंतर सोफियानकडून तिची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच तिच्या घरावर छापा टाकला नाही. तर आधी पोलिसांनी तिच्या घरावर पाळत ठेवली. त्यानंतर संधी मिळताच तिच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात तिच्या घरात ५ हजार एक्स्टेंसीच्या गोळ्या आढळल्या. विशेष म्हणजे अंमली पदार्थांचा इतका मोठा साठा अश्विनी पॉलच्या घरात सापडेल, असा पोलिसांना अंदाज नव्हता. तर तिलादेखील आपल्या घरी पोलीस छापा टाकतील, असे वाटले नव्हते.
बारबाला ते ड्रग्ज सप्लायर, अश्विनी पॉलचा इतिहास
अश्विनी पॉल ही सध्या अंमली पदार्थांची तस्करी करत होती. पण तिचा इतिहास पोलिसांनी शोधून काढला आहे. अश्विनी ही पूर्वी डान्सबारमध्ये बारबाला म्हणून काम करत होती.ती मूळची पुण्याची आहे. डान्सबारमधील काम सोडल्यानंतर ती ड्रग्ज सप्लायर बनली. अश्विनीची दोन लग्ने झाल्याची माहिती आहे. तिचा पती हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अश्विनी इतकी चालाख आहे की, ती दर दोन-तीन महिन्यांनी ती घरबदल असे.