Mumbai : देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणासाठी पालिकेच्या सोयीसुविधा; म्हैस, बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन 
मुंबई

Mumbai : देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणासाठी पालिकेच्या सोयीसुविधा; म्हैस, बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन

बकरी ईद सणानिमित्त देवनार पशुवधगृहात सीसीटीव्हीची नजर, धार्मिक वधासाठी स्लॉट बुकिंगची सुविधा, म्हैस आदी प्राण्यांचा धार्मिक वध हा देवनार पशुवधगृहात करणे बंधनकारक आहे, असे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : बकरी ईद सणानिमित्त देवनार पशुवधगृहात सीसीटीव्हीची नजर, धार्मिक वधासाठी स्लॉट बुकिंगची सुविधा, म्हैस आदी प्राण्यांचा धार्मिक वध हा देवनार पशुवधगृहात करणे बंधनकारक आहे, असे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले. देवनार पशुवधगृह येथे विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज आहे. १७ ते ३० मे या कालावधीत पशुवधगृह येथे म्हैस आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात देवनार पशुवधगृह येथे बकरी ईद सणाच्या निमित्ताने विविध सोयीसुविधा पुरविण्यात येतात. यंदा २८ मे रोजी बकरी ईद सण साजरा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पालिकेचे विविध विभाग आणि अन्य यंत्रणांकडून देवनार पशुवधगृह येथे करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत पालिका मुख्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, बकरी ईद सणाच्या निमित्ताने, मुंबई महापालिकेच्या बाजार विभागामार्फत २८ ते ३० मे २०२६ दरम्यान पालिका क्षेत्रात एकूण १०९ ठिकाणी धार्मिक पशुवधासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्देशित ठिकाणी किंवा इतर ठिकाणी धार्मिक पशुवध करायचा असल्यास त्याच्या परवानगीकरिता अर्ज करण्यासाठी पालिकेच्यावतीने यंदा MyBMC मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. धार्मिक पशुवधासाठी म्हैस व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार संगणकीय वाडे वाटप प्रणाली कार्यान्वित असणार आहे.

'अशा' आहेत सोयीसुविधा

एकूण १ लाख १० हजार १०६ चौरस मीटर क्षेत्रावर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे तसेच म्हैसवर्गीय पशूंच्या धार्मिक पशुवधासाठी १० हजार चौरस मीटर जागेची व्यवस्था केली जात आहे. दैनंदिन १.३ दशलक्ष लिटर पाण्याव्यतिरिक्त १ दशलक्ष लिटर पाण्याची अतिरिक्त सुविधा असेल. नागरिकांसाठी १० ठिकाणी पाणपोई उभारण्यात येतील तसेच ठिकठिकाणी सुमारे १५० पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था राहील. नागरिकांसाठी २ आरोग्य केंद्र, २ रुग्णवाहिका, पशुंसाठी २ पशुवैद्यकीय आरोग्य केंद्र व पशुवैद्यकांची नेमणूक करण्यात येईल.

२४ बाय ७ सुविधा उपलब्ध!

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २४ X ७ कार्यरत नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ९०७६०००४८१, ९०७६०००४८२, ९०७६०००४८३, ९०७६०००४८४ हे क्रमांक उपलब्ध केले जातील.

तगडा बंदोबस्त

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने देवनार पशुवधगृह येथे २१ पोलीस चौकी, २ निरीक्षण मनोऱ्यांसह सुमारे ५०० पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची तसेच पालिकेच्या २०० सुरक्षारक्षकांची नेमणूक राहील तसेच संपूर्ण परिसरात निगराणीसाठी २१० स्थायी कॅमेऱ्यांसह १७० बुलेट कॅमेरे, ३४ डोम कॅमेरे, ६ पीटीझेड कॅमेरे, व्हिडीओ वॉलसह सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असेल. ]

SRA कायद्याचे ऑडिट करा, तज्ज्ञ समिती नेमा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

प्राणी गणनेत जळगाव जिल्ह्यात तीन वाघांचे दर्शन; वढोदा-चारठाणा परिसरातील 'बनाना टायगर' क्षेत्र पुन्हा चर्चेत

व्यापार करार अधांतरी! भारत-अमेरिका व्यापार चर्चेचा वेग मंदावण्याची शक्यता

मुंबई विभागातील १ हजार ४६१ शाळांचा निकाल १०० टक्के; सर्वाधिक ५९५ शाळा; ठाण्यात ४४२ शाळांची उल्लेखनीय कामगिरी

मालमत्ताधारकांना आता मिळणार ‘अंतिम मालकी’; नव्या कायद्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव