बेस्टच्या ताफ्यात ५ हजार स्वमालकीच्या बस; निधी उभारणीच्या आराखड्याला सुरुवात (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : बेस्टच्या ताफ्यात ५ हजार स्वमालकीच्या बस; निधी उभारणीच्या आराखड्याला सुरुवात

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पुढील तीन वर्षांत ५ हजार स्वमालकीच्या बस दाखल होणार आहेत.

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पुढील तीन वर्षांत ५ हजार स्वमालकीच्या बस दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार या बस खरेदीसाठी आवश्यक निधी उभारणीचे नियोजन बेस्ट प्रशासनाने सुरू केले असून, येत्या १५ दिवसांत यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव बेस्ट समितीसमोर सादर केला जाणार असल्याचे बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले.

सध्या बेस्टच्या ताफ्यात सुमारे २,८०० बस असून त्यापैकी जवळपास २,५०० बस भाडेतत्त्वावरील आहेत. या बसेसच्या माध्यमातून शहरातील सुमारे ४०० मार्गांवर दररोज २३ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत ही संख्या अपुरी असून मुंबईसाठी किमान १० हजार बसेसची गरज आहे.

गेल्या १८,१९ व २० जून हे तीन दिवस विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. सुरुवातीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांशी चर्चा करून तोडगा काढला. बैठकीत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना प्रतिमहिना ३ हजार रुपये, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना २ हजार रुपयांची वेतनवाढ जाहीर करण्यात आली होती. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी चालू आर्थिक वर्षात अदा करण्यात येतील, असेही आश्वासन देण्यात आले होते.

याच बैठकीत बेस्टचा ताफा मजबूत करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५ हजार स्वमालकीच्या नव्या बस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. या बस खरेदीसाठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी निधी कोणत्या माध्यमातून उभारायचा याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

टप्प्याटप्प्याने मनुष्यभरती!

बेस्टच्या ताफ्यात ५ हजार स्वमालकीच्या बस घेण्याबाबतचे मंत्रालयाचे अधिकृत इतिवृत्त (मिनिट्स) सोमवारी रात्री प्राप्त झाले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद, आर्थिक आराखडा आणि अंमलबजावणीचे नियोजन सुरू आहे. येत्या १५ दिवसांत यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव बेस्ट समितीसमोर सादर केला जाईल. नव्या बसेससाठी आवश्यक मनुष्यबळाची भरतीही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, असेही सोनिया सेठी यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद

आठव्या आशियाई विजेतेपदाचे लक्ष्य! महिलांच्या टी-२० आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आज भारत आणि श्रीलंका भिडणार

BRICS Summit 2026 : पहलगाम हल्ल्याचा 'ब्रिक्स'कडून निषेध; 'नवी दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले

संजू की वैभव? भारतासमोर निवडीचा पेच; अफगाणिस्तानच्या फिरकी आव्हानासाठी भारतीय संघ सज्ज, उभय संघात पहिला टी-२० सामना आज