मुंबई : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९ मे पासून वाढ केली. साध्या बसचे तिकीट ५ रुपयांवरून १० रुपये, तर एसी बसचे तिकीट ६ रुपयांवरून १२ रुपये केले. मात्र तिकीट दरात वाढ केल्यानंतर ३० लाख प्रवासी संख्या २५ लाखांवर आली आहे. परंतु प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात वाढ झाली असून सद्यस्थितीत रोज ३.२५ कोटींचा महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा होतो.
गेल्या १० वर्षांत मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून दिवसेंदिवस आर्थिक कोंडी वाढतच गेली
आहे. आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे पैशांची मागणी केली असता २०१६ ते आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला मदत केली. तरीही बेस्टची आर्थिक कोंडी वाढतच गेल्याने अखेर बेस्ट उपक्रमाला तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या मंजुरीनंतर
रिजनल ट्राफिक ॲथोरिटीने तिकीट दर वाढीला मंजुरी दिली. अखेर ९ मे पासून तिकीट दरात वाढ झाली. साध्या बससाठी पहिल्या पाच किमीसाठी ५ रुपयांऐवजी १० रुपये, तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमीसाठी ६ रुपयांऐवजी
१२ रुपये अशी तिकीट
दर वाढ झाली. तिकीट दर वाढ झाल्याने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत भर पडत असली तरी प्रवासी संख्येत मात्र घट झाली आहे, असे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
प्रवासी संख्या २५ लाखांवर
९ मे पूर्वी रोजचे ३० लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करत होते. मात्र ९ मे पासून तिकीट दरात वाढ झाली आणि प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. ६ ऑगस्ट २०२५ रोजी उपक्रमाची प्रवासी संख्या २५ लाखांवर पोहचली असून दैनंदिन उत्पन्न हे ३.२५ कोटी इतके झाल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.