मुंबई

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

Swapnil S

गिरीश चित्रे/मुंबई

महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला पालिकेने बसेसच्या तिकिट दरात वाढ करण्यास सुचवले आहे. त्यामुळे सध्या असलेले साध्या बसचे ५ रुपये तिकीट आता ७ रुपये, तर वातानुकूलित बसचे ६ रुपयांचे तिकीट १० रुपये होणार आहे. याबाबतच्या हालचालींना वेग आला असून ही दरवाढ कधीही अंमलात येऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली होती. मात्र, पालिकेने पैसे देण्यास नकार देत बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीचे पर्याय सुचवले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर ‘बेस्ट’च्या प्रवाशांना दरवाढीचा झटका बसणार आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेनंतर ‘बेस्ट’ बसेस मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखली जाते. स्वस्त, सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून प्रवासी आजही बेस्ट बसेसना पसंती देतात. आजच्या घडीला बेस्टच्या तीन हजार बसेसमधून दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमास उतरती कळा लागली असून दिवसेंदिवस बेस्टची आर्थिक कोंडी वाढतच आहे.

आर्थिक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांची देणी देणे शक्य होत नसल्याने सन २०१६-१७ मध्ये बेस्ट उपक्रमाने पालिकेकडे अनुदानाची मागणी केली. त्यावेळचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. सन २०१६ ते आतापर्यंत पालिकेने बेस्ट उपक्रमास तब्बल ८,५०० कोटींची आर्थिक मदत केली. मात्र, आतापर्यंत केलेल्या मदतीचा हिशोब बेस्ट उपक्रमाने पालिकेला दिलेला नाही. त्यामुळे तीन हजार कोटींची बेस्टची मागणी पालिका प्रशासनाने फेटाळून लावत बेस्टला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीचे नवीन स्त्रोत शोधण्याचे निर्देश बेस्ट उपक्रमास दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर बेस्ट बसेसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

साधी बस

- ५ किमी - ५ रुपये

- १० किमी - १० रुपये

- १५ किमी - १५ रुपये

- २० किमी व पुढे २० रुपये

एसी बस

- ५ किमी - ६ रुपये

- १० किमी - १३ रुपये

- १५ किमी - १९ रुपये

-२० किमी व पुढे २५ रुपये

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस