मुंबई : मुंबई महानगरपालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी सोमवारी तातडीने ८० कोटी रुपये ऑनलाईन बेस्टकडे जमा केले असले तरी, मंगळवारी सायंकाळ पर्यंततरी निवडणूक आयोगाकडून बोनस वाटण्यासाठी परवानगी मिळाल्याचे वृत्त नव्हते.
लवकरच निवडणूक आयोगाकडून बोनसच्या वाटपासाठी बेस्टला परवानगी दिली जाईल आणि उशिराने का होईना आपली दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा बेस्टच्या २६ हजार कर्मचाऱ्यांना आहे. बोनस पदरात पडण्यासाठी सध्या 'थांबा आणि पाहा' या धोरणाशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. कारण सध्या निवडणूक आयोगाचा अंमल सुरू आहे.
बेस्टची आर्थिक अवस्था नाजूक असल्याने बोनससाठी महापालिकेकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून राहावे लागत आहे. हा निधी मिळाल्यानंतरही निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने त्याच्या वाटपासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी पत्र लिहिण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत तरी निवडणूक आयोगाकडून बेस्टला याबाबत काही कळविण्यात आले नव्हते, असे बेस्टमधील सूत्रांनी सांगितले. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, मी उद्या बेस्ट प्रशासनाकडे यासंदर्भात चौकशी करणार आहे.
यंदाही महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्येच ही रक्कम मिळाली. पण बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात अद्याप बोनसची रक्कम पडलेली नाही. त्यासाठी कामगार संघटनांना अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात खेटे घालावे लागत आहेत.