ANI
मुंबई

‘बेस्ट’वरील नियुक्तीवरून सरकारमध्ये समन्वयाचा अभाव; दोन वेगवेगळ्या विभागांचे शासन निर्णय जारी

आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यावर सोपवण्यासाठी राज्य सरकारचा सामान्य प्रशासन विभाग व नगर विकास विभागाचे वेगवेगळे शासन निर्णय जारी केले.

Swapnil S

मुंबई : आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यावर सोपवण्यासाठी राज्य सरकारचा सामान्य प्रशासन विभाग व नगर विकास विभागाचे वेगवेगळे शासन निर्णय जारी केले. मात्र मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते. तर वस्तू व सेवा कर आयुक्त आशीष शर्मा यांची बेस्ट महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केल्याचे परिपत्रक राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले. दरम्यान, आशीष शर्मा यांनी रात्री उशिरा पदभार स्वीकारला. एकाच पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात संघर्ष झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक एस व्ही. आर श्रीनिवास राव १ ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त झाले. त्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे बेस्ट उपक्रमाचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी रात्री नगर विकास विभागाने परिपत्रक जारी करत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करत आशीष शर्मा यांची महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमासाठी फडणवीस आणि शिंदे यांच्यात संघर्ष सुरू होता. मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी दोन्ही विभागांनी धाव घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आशीष शर्मा यांनी स्वीकारला पदभार

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक एस व्ही.आर श्रीनिवास राव १ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर वस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्मा यांनी बुधवारी महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथून पब्लिक पॉलिसी अँड ॲडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून बी. टेक. ही पदवी संपादन केली आहे. आशिष शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पॉवर जनरेशन कार्पोरेशन लि., आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका इत्यादी महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार पाहिला आहे.

एका पदासाठी दोघांच्या नियुक्त्या - सपकाळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून संघर्ष सुरू आहे. एका पदासाठी एका दिवशी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास