Mumbai : भांडुपमध्ये बांधकामस्थळी दुर्घटना; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, ९ जण जखमी, VIDEO व्हायरल 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : भांडुपमध्ये बांधकामस्थळी दुर्घटना; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, ९ जण जखमी, VIDEO व्हायरल

भांडुप पश्चिमेतील मेट्रो मॉलजवळील एसआरए बांधकामस्थळी खड्ड्यात पडून ९ जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

किशोरी घायवट-उबाळे

भांडुप पश्चिम परिसरात गुरुवारी (दि. २३) उशिरा रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या जागेवरील खड्ड्यात पडून ९ जण जखमी झाल्याची घटना घडली. मेट्रो मॉलजवळील जनता मार्केट परिसरात ही दुर्घटना घडली असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लग्नातील वऱ्हाडी जखमी

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, काका पेट्रोल पंपच्या मागे असलेल्या मातेश्वरी हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरू असताना एका मुलीची छेड काढल्याने वाद निर्माण झाला. छेड काढणाऱ्या अज्ञात तरुणाला पकडण्यासाठी लग्नातील काही तरुण त्याच्या मागे धावले.

पाठलाग करत असताना तो तरुण श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर गेला. त्याला शोधण्यासाठी गेलेल्या तरुणांनी तिथे लाकडी फळी आणि पत्र्याने झाकलेली एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) टाकी पाहिली. अंधारामुळे अंदाज न आल्याने एक तरुण आधी त्या खोल टाकीत पडला.

बचाव करताना दुर्घटना वाढली

त्या तरुणाला बाहेर काढण्यासाठी इतर नातेवाईक आणि तीन मजूर मिळून मदत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तात्पुरत्या पत्र्याचा आधार तुटल्याने एकामागोमाग एक जण त्या टाकीत कोसळले. या दुर्घटनेत एकूण ९ जण जखमी झाले.

तातडीने बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि पालिकेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य राबवण्यात आले.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये जखमींना खांद्यावर उचलून नेताना आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी बचावकार्य करताना दिसत आहेत.

जखमींची प्रकृती स्थिर

काही जखमींना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये अनिकेत कदम (२६), श्रेयस सुर्वे (२५), जयदीप शाह (२१), संकेत जुवाटकर (२५), आदित्य आहेर (२६), अनिकेत महेश पाटील (२०) आणि अंकित कुमार रोहित (१९) यांचा समावेश आहे.

एकाचा दुर्दैवी मृत्यू

भालचंद्र फाळे (२५) यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह

प्राथमिक तपासात ही घटना बांधकामस्थळी असलेल्या खड्ड्यामुळे घडल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनास्थळी आवश्यक सुरक्षा उपाय, बॅरिकेडिंग किंवा इशारा फलक होते का, याबाबत चौकशी केली जाणार आहे.

या घटनेनंतर बांधकामस्थळांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम