भाईंंदर : काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल कॉम्प्लेक्स परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून आई-मुलावर चौघांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मोहम्मद शफात शहबाज उस्मानी हा ११ जुलै रोजी दुपारी सोसायटीत दुचाकी पार्क करत असताना समोरील मेविश टॉवरमध्ये राहणारा सुलतान नासिर खान याने, ‘येथे गाडी पार्क करू नको, ही जागा आमची आहे,’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सुलतानने शफातच्या कानशिलात मारली. त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी तरुणाने शफातला ढकलून खाली पाडले. त्यानंतर दोघांनी मिळून त्याला लाथाबुक्क्यांनी व ठोशांनी बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान सुलतानने परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने, "मैं कौन हूं, तू जानता नहीं... कुर्ला में जाकर पूछ लेना, तेरी कुंडली निकाल दूंगा," अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शफातने आरडाओरडा केल्यानंतर त्याची आई शबनम उस्मानी या मुलाला वाचवण्यासाठी घटनास्थळी धावून आल्या. मात्र, त्याचवेळी सुलतानचे वडील नासिर खान आणि भाऊ अल्तमश खान हेही तेथे पोहोचले. चौघांनी मिळून आई-मुलाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. सुलतानने शबनम उस्मानी यांच्या छातीवर हात लावून जोराचा धक्का दिल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. या मारहाणीत त्यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.