बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशन घेतेय आकार; जमिनीखालील ३० मीटरवर बहुस्तरीय केंद्राचा टप्पा पूर्णत्वाकडे प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशन घेतेय आकार; जमिनीखालील ३० मीटरवर बहुस्तरीय केंद्राचा टप्पा पूर्णत्वाकडे

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरअंतर्गत मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील भूमिगत बुलेट ट्रेन स्टेशनचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. जमिनीखाली सुमारे ३२ मीटर खोलीवर हे बहुमजली स्टेशन आकाराला येत असून ते बांधकामाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे.

Swapnil S

स्वीटी भागवत/मुंबई

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरअंतर्गत मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील भूमिगत बुलेट ट्रेन स्टेशनचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. जमिनीखाली सुमारे ३२ मीटर खोलीवर हे बहुमजली स्टेशन आकाराला येत असून ते बांधकामाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे.

‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’द्वारे (एनएचआरसीएल) या ५०८ किमी लांबीच्या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १५५ किमी, गुजरातमधील ३५१ किमी आणि दादरा-नगर हवेलीतील २ किमी अंतराचा समावेश आहे. बीकेसी ते ठाण्यातील शिळफाटा दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ५ किमी अंतराचे खोदकाम ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’द्वारे (एनएटीएम) पूर्ण झाले आहे. मुंबईतील तिन्ही उन्नत स्थानकांचे काम सुरू झाले असून बीकेसी भूमिगत स्थानकावर स्लॅब कास्टिंगचे काम सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचा भाग असलेल्या या स्थानकाच्या बांधकामाचा आढावा घेतला असता, ते सध्या प्रगत टप्प्यावर असल्याचे दिसून येते. अभियंत्यांनी उत्खनन आणि पायाभरणीचे महत्त्वाचे काम पूर्ण केले असून, सर्वात खालच्या स्तरावर दाट स्टील रिइन्फोर्समेंट बार बसवण्याचे काम झाले आहे, जिथे भविष्यात रेल्वे ट्रॅक टाकले जातील.

या कॉरिडॉरमध्ये एकूण १२ स्थानके असतील, त्यात मुंबई (बीकेसी), ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश असेल.

हे भूमिगत स्टेशन बहुस्तरीय रचनेचे असून सर्वात खालच्या थरावर रेल्वे रूळ असतील. त्याच्या वर प्लॅटफॉर्म स्तर, तिकीट खिडक्या, प्रवासी कॉन्कोर्स आणि तांत्रिक यंत्रणेसाठी स्वतंत्र मजला नियोजित आहे. जमिनीवर स्टेशनचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग असतील. बीकेसीच्या व्यावसायिक महत्त्वास अनुसरून राज्य सरकारने या स्टेशनच्या वर एक आयकॉनिक व्यावसायिक इमारत उभारण्याचेही संकेत दिले आहेत. येथे सहा प्लॅटफॉर्मची सोय असेल.

अभियांत्रिकीचे कौशल्य

या बांधकामात जमिनीची स्थिरता राखण्यासाठी ‘डीप पायलिंग’ आणि सिलिंडर आकाराच्या आधारभूत संरचनांचा वापर करण्यात आला आहे. अवजड यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी साइटवर तात्पुरते पूल बांधण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर काँक्रीट ओतताना निर्माण होणारी उष्णता नियंत्रित करण्यासाठी अभियंते ‘कूल्ड काँक्रीट पंपिंग’सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

या यंत्रणांचा वापर

ड्रेनेज कास्टिंग गॅन्ट्री: झिरपलेले पाणी गोळा करून बाहेर काढण्यासाठी.

वॉटरप्रूफिंग गॅन्ट्री: पाणी आत येऊ नये म्हणून विशेष पडदा (membrane) बसवण्यासाठी.

लायनिंग गॅन्ट्री: बोगद्याला कायमस्वरूपी मजबूती आणि गुळगुळीत फिनिश देण्यासाठी शेवटचे काँक्रीट लायनिंग करणे.

बोगद्याचे काम आणि ६ प्लॅटफॉर्म

हे स्थानक २१ किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याला जोडले जाईल, जो मुंबईतील हायस्पीड कॉरिडॉरचा सर्वात लांब भाग आहे. हे काम टनेल बोरिंग मशीन आणि एनएटीएम पद्धतीने केले जात आहे. विक्रोळी आणि घणसोली येथील शाफ्टचा वापर टीबीएम लाँच करण्यासाठी केला जात आहे. बीकेसी स्थानकावर एकूण ६ प्लॅटफॉर्म असतील. वेगाने सुरू असलेले हे बांधकाम भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात गुंतागुंतीचा आणि महत्त्वाकांक्षी भाग मानले जात आहे.

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

नाशिक-विदर्भ प्रवाशांसाठी खुशखबर! 'स्पेशल'चा टॅग हटला, नाशिक रोड-बडनेरा मेमू आता नियमित, १६ स्थानकांना थांबा

Video : अवघ्या ५ मिनिटांच्या उशिराची 'अशी' शिक्षा? डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून फ्लॅटमध्ये नेलं अन्...

CJP चे Instagram हँडल अचानक बंद, काही तासांत पुन्हा सुरू; अभिजीत दिपके म्हणाले - 'स्वातंत्र्यदिनी आमचा आवाज...

Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO