मुंबई

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी

BKC मध्ये सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम सुरू होताच रिक्षाचालकांच्या मनमानीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. टिळक नगर ते BKC प्रवासासाठी एका रिक्षाचालकाने मीटरऐवजी ३०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला असून मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

Mayuri Gawade

वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी 'साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन' उपक्रमाला सुरुवात झाली असतानाच रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात प्रवाशांकडून तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. टिळक नगर, कुर्ला आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) परिसरात काही रिक्षाचालक मीटरने प्रवास करण्यास नकार देत अवाजवी भाड्याची मागणी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टिळक नगर ते BKC साठी ३०० रुपयांची मागणी

उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी एका प्रवाशाने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला. त्यानुसार, टिळक नगर रेल्वे स्थानकाबाहेर एका रिक्षाचालकाला BKC ला जाण्यास सांगितले असता त्याने मीटरने येण्यास नकार दिला आणि थेट ३०० रुपये भाड्याची मागणी केली.

इतकेच नव्हे तर, त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने शेअर रिक्षाचा पर्याय देत प्रत्येक प्रवाशाकडून २०० रुपये आकारण्याचा प्रस्ताव दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.

LTT आणि कुर्ला परिसरातही तीच समस्या

दुसऱ्या एका प्रवाशानेही अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कुर्ला स्थानक परिसरात रिक्षाचालकांकडून मीटरऐवजी ठराविक रक्कम मागितली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, LTT ते कुर्ला पूर्व या छोट्या अंतरासाठी मीटरनुसार साधारण ४५ ते ५० रुपये भाडे येते. मात्र काही रिक्षाचालकांकडून यासाठी तब्बल १०० रुपये आकारले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मुंबई पोलिसांची दखल

ही बाब सोशल मीडियावर समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. पोलिसांनी संबंधित तक्रार BKC वाहतूक विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. "ही बाब आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आवश्यक कारवाईसाठी BKC ट्रॅफिक विभागाला माहिती देण्यात आली आहे," असे मुंबई पोलिसांनी आपल्या प्रतिसादात म्हटले आहे.

BKC मधील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने BKC साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शुक्रवारी BKC मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांऐवजी लोकल रेल्वे, मेट्रो, बस आणि शेअर्ड मोबिलिटी सेवांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि शाश्वत प्रवासाला प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मात्र, उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांकडून मीटरनुसार प्रवासास नकार देणे आणि अवाजवी भाड्याची मागणी केल्याच्या तक्रारी समोर आल्याने या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

मृतदेहाच्या गुप्तांगावरील विनोद भोवला! KEM ची डॉक्टर तरुणी अडचणीत; ३७० बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेच्या शोतील आणखी एक क्लिप व्हायरल

Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत