मुंबई

तळोजा कारागृहात कैद्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा पुरवठामध्ये काळाबाजार

प्रतिनिधी

नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात कैद्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा कमी करण्यात आला असून त्या पाण्याची काळाबाजारात विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी सागर गोरखे याने हा आरोप करून कैदी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असा इशारा देणाऱ्या पत्राची प्रत राज्याचे गृहमंत्री, सत्र न्यायालय, पोलीस महासंचालक, कारागृह प्रशासन आणि मानवाधिकार आयोगाला पाठविली आहे.

तळोजा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांचा भरणा करण्यात आला आहे. सत्र न्यायालय कारागृहाच्या नियमावलीनुसार कैद्यांना मुलभूत सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र पाणी, वैद्यकीय सुविधा देण्याबाबत तुरूंग प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. नियमानुसार प्रत्येक कैद्याला दिवसाला १३५ लिटर पाणी देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ एक बादली म्हणजेच १५ लिटर पाणी दिले जात आहे. या एका बादलीत त्या कैद्याला संपूर्ण दिवस काढायला भाग पाडले जात आहे. पाण्याचा तुटवडा नसताना हा प्रकार सुरू असून प्रत्येक कैद्याच्या वाट्याचे उर्वरित पाणी बाहेर काळाबाजारात विकले जात आहे, असा आरोपही सागर गोरखेने केला आहे.

तसेच कारागृहातील स्वच्छतेबरोबरच अन्य बाबींवर या पत्रात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या बॅरेक म्हणजे नरक झाला आहे. घाणीचे साम्राज्य असल्याने कैद्यांना त्वचारोगांना सामोरे जावे लागत आहे. कैद्यांना माफक वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जात नाहीत. शहरी नक्षलवादाच्या खटल्यातील अन्य आरोपींवर अन्याय केला जात आहे. आरोपींना भेटायल्या येणाऱ्या नातेवाईकांना जुनाट पद्धतीमुळे भेट घेण्यासाठी ५-६ तास वाट पाहावी लागत आहे. दिवसाला जवळपास ५०० नातलग दूरदूरहून कैद्यांना भेटण्यासाठी येतात, मात्र त्यांना वाट पाहण्यासाठी वेटिंग रूमची कोणतीही सोय नाही. नातलगांना पाठवण्यात येणारी पत्रे आधी स्कॅन करून तपास यंत्रणेकडे पाठवली जातात. तसेच त्यांच्याकडून येणारी पत्रे कुरिअर आधी तपास यंत्रणेना दिली जातात, मग त्यातला बरासचा ऐवज गायब करून मग ते दिले जाते, अशा तक्रारींचा पाढाच या पत्रातून वाचण्यात आला आहे.

तसेच या सर्व परिस्थितीचा निषेध म्हणून २० मे रोजी शहरी नक्षलवाद प्रकरणातील सर्व कैद्यांनी कारागृहात एकदिवसीय उपोषण केले होते. मात्र, गोरखे यांनी माफक सुविधा पुरवल्या जात नाहीत तोवर आपले उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अन्य कैदीही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचा इशारा या पत्रातून दिला आहे.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव