मुंबई : विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने केलेली तोडक कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या म्युनिसिपल इंजिनिअर असोसिएशनने मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी इंजिनिअर्स असोसिएशनने केली आहे.
पालिकेच्या के पूर्व विभागाने जैन मंदिरावर हातोडा चालवल्यानंतर तोडक कारवाईविरोधात समाजाला भडकावण्याचे काम केले असल्याचा आरोप इंजिनिअर्स असोसिएशनने केला आहे. समाजाचा मोर्चा काढून पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर पालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडफडकी बदली झाली होती, असे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आले आहे. ते मंदिर नसून पत्रा शेड होते. तोडक कारवाईदरम्यान कोणी पुढे आले नाही. उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर हे सगळे समोर आले होते. सहआयुक्त नवनाथ घाडगेंचे पुनर्स्थापन सन्मानाने करायला पाहिजे. गोपनीयतेची शपथ घेतलेले मंत्री कसे काय एका समाजाला भडकावतात? मोर्चाचे नेतृत्व कसे करू शकतात? असे सवाल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.
‘त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी’
मुंबई महानगरपालिकेने धर्मांध झुंडशाहीच्या समोर गुडघे न टेकता अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी पालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. विलेपार्ले येथील जैन मंदिराचे बेकायदेशीर बांधकामावर महापालिका प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तोडक कारवाई सुरू केली. या मंदिराबाबत केलेल्या कारवाईने संतप्त होऊन मोठ्या प्रमाणावर जैन समाज रस्त्यावर उतरला, असे नाईक म्हणाले.