मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुंबईवासियांच्या आरोग्यासाठी जोरदार शक्तिवर्धक इंजेक्शन देण्यात आले आहे. आरोग्य विभागासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत घसघशीत २२ टक्के वाढ करून यंदा ७४५६.८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृद्ध मन, निरोगी जीवन : आमचे नागरिक हाच आमचा सर्वोत्तम ठेवा” असे ध्येयवाक्य ठेवून सर्व स्तरांवरच्या आरोग्य सेवांचा विस्तार करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे., संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांवरील नियंत्रण, डिजिटल आरोग्य व्यवस्था आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलचा अधिक वापर या त्रिसूत्रीच्या आधारे हा विस्तार होणार आहे.
सार्वजनिक-खासगी सहभाग धोरणांतर्गत शहरात नव्या डायलिसिस केंद्रांची उभारणी प्रस्तावित आहे. २०२५ मध्ये १० केंद्रांमधून २० हजारांहून अधिक डायलिसिस सत्रे राबविण्यात आली. पुढील टप्प्यात आणखी केंद्रे सुरू करून सीटीस्कॅन, एमआरआय, कॅथलॅब, रक्तपेढी आदी सुविधा खासगी भागीदारीतून उपलब्ध करण्याचा मानस आहे.
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत दरवर्षी ६० लाखांहून अधिक बाह्यरुग्ण, २.५० लाखांहून अधिक अंतर्गत रुग्ण आणि सुमारे १.५० लाख शस्त्रक्रिया होतात. उपनगरी रुग्णालयांत ५३ लाखांहून अधिक बाह्यरुग्ण आणि १.९० लाखांहून अधिक अंतर्गत रुग्णांना सेवा दिली जाते.
एकूणच, या अर्थसंकल्पात डिजिटल प्रणाली, तंत्रज्ञानाधारित निदान, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि प्रशिक्षणावर भर देत ‘सर्वांसाठी सुलभ, वाजवी आणि दर्जेदार आरोग्यसेवा’ देण्याचा पालिकेचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून आतापर्यंत १०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मालाड, बोरिवली, मुलुंड आणि वांद्रे येथील रुग्णालयांत नव्याने डीएनबी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
संसर्गजन्य रोगांवर लक्ष
एमडीआर क्षयरोगासाठी बीपाल्म उपचार पद्धतीचा वापर
मलेरिया व डेंग्यू नियंत्रणासाठी आयसीएमआर आणि एनआयएमआरच्या सहकार्याने संशोधन
फोकस-आधारित सर्वेक्षण आणि नियोजित फॉलो-अप
‘क्षयरोग मुक्त भारत’ अभियानांतर्गत ४८ हँडहेल्ड एक्स-रे मशिनद्वारे २६,१९४ संशयितांची तपासणी
प्राथमिक आरोग्य सेवेला बळ
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना’ उपक्रमातून १.३५ कोटी नागरिकांनी सेवा घेतली असून ३३ पॉलीक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर्समधून ३.३० लाख नागरिकांना लाभ झाला आहे.
गर्भवती महिलांची तपासणी
‘माँ मित्र’ उपक्रम ३८ ठिकाणी सुरू असून १४,६४५ महिलांची तपासणी, २०० नोंदणी आणि सुमारे २,००० महिलांना मानसिक आधार देण्यात आला. शाळांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराविरोधात जनजागृती केली जाणार आहे.
विस्तारित लसीकरण कार्यक्रम
१४ वर्षांच्या मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. यू-विन पोर्टलद्वारे बालकांच्या लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी व अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
‘फिट मुंबई’ कार्यक्रम
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) संकल्पनेवर आधारित ‘फिट मुंबई’ उपक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाईल. उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आदी असंसर्गजन्य रोगांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.