मुंबई

‘चावीवाल्यां’च्या अंगणी उजळले ऋणानुबंधांचे दीप; कामगार नगर, अग्निशमन वसाहतीला गगराणी दाम्पत्याची भेट

मुंबईसारख्या महानगराला दररोज अनेक सेवांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका सतत जिवंत ठेवत असते. ‘एक कुटुंब’ म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे दिवाळी सण साजरा करत असल्याचे पाहून अतिशय आनंद झाला, असे गगराणी यावेळी म्हणाले.

Swapnil S

मुंबई : मुंबई म्हणजे वेळेशी शर्यत लावणारे महानगर. मुंबईच्या अंगात जणू धावत्या घड्याळाचा ठोकाच धडधडत असतो. हे महानगर अहोरात्र धावत असते. अशा या न थांबणाऱ्या मुंबईला सतत तृप्त, सशक्त आणि आनंदी ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध सेवा देत सतत झटत असते. या सेवांमध्ये पाणीपुरवठा सेवा म्हणजे महानगराच्या धमन्यांमधून वाहणारा जीवनरस. या जीवनरसाला अविरत वाहते ठेवणारे हात म्हणजे महानगरपालिकेचे ‘चावीवाले’ कर्मचारी. त्यांच्या अथक श्रमांमुळे मुंबईच्या प्रत्येक घरात हा जीवनरस पोहोचतो. याच चावीवाल्या कामगारांच्या कुर्ला कामगार नगर येथील वसाहतीला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सदिच्छा भेट देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. आपल्या संस्थेचे प्रमुख थेट आपल्या दारी आलेले पाहून, चावीवाले, पंपचालक, कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दीपोत्सवाचे रंग उजळले.

मुंबईसारख्या महानगराला दररोज अनेक सेवांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका सतत जिवंत ठेवत असते. ‘एक कुटुंब’ म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे दिवाळी सण साजरा करत असल्याचे पाहून अतिशय आनंद झाला, असे गगराणी यावेळी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “प्रशासनात धोरणात्मक निर्णय जरी आम्ही घेत असलो तरीही, प्रत्यक्ष शेवटच्या व्यक्तीशी लोकांचा संबंध हा यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा येतो. दिवाळी सणाच्या निमित्ताने कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली. यंत्रणा अहोरात्र काम करत असतानाच त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरा करण्याची पोचपावती या भेटीच्या निमित्ताने मिळाली.”

गतवर्षापासून आयुक्त गगराणी यांनी दिवाळीनिमित्त थेट कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे दुसरे पुष्प गगराणी यांनी रविवारी कुर्ला येथील कामगार नगर वसाहतीत गुंफले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. शीतल गगराणी या आवर्जून उपस्थित होत्या.

अग्निशमन दलाच्या वसाहतीलाही सदिच्छा भेट

मुंबईवर कोणतेही संकट आले असता, मुंबई अग्निशमन दल तत्परतेने या संकटाला सामोरे जाते आणि त्यातून मुंबईकरांची सुखरूप सुटका करते. दादर येथे मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या वसाहतीलाही गगराणी दाम्पत्यांनी दिवाळीनिमित्त भेट दिली. या ठिकाणी देखील त्यांनी सर्व जवानांच्या परिवाराला दिवाळीचा फराळ भेट दिला. मंगेश शिवडीकर, शरद कुमावत, नारायण कोकितकर, राजेश सावंत आदी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गगराणी यांनी दिवाळीनिमित्त भेट दिली. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपअग्निशमन अधिकारी अनिल परब, के. आर. राव, विभागीय अग्निशमन अधिकारी मनोज सावंत यावेळी उपस्थित होते.

संचार साथी : ‘बिग ब्रदर’चा डिजिटल अवतार

मनुपेक्षा मेकॉले चांगला!

आजचे राशिभविष्य, ८ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा