मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने विविध पक्षांतील निष्ठावंतांनी बंडाचे हत्यार उपसले असून त्यांची पक्ष नेतृत्त्वाकडून मनधरणी करण्यात येत आहे. दुसरीकडे उमेदवारी जाहीर होऊनही काही जणांना वेळेत अर्ज भरता न आल्याने त्यांची निवडणूक लढवण्याची संधी हुकली. त्यामुळे त्या उमेदवाराशी संबंधित राजकीय पक्षालाही फटका बसला आहे. काही उमेदवारांची कागदपत्रे योग्य नसल्याने ते निवडणुकीतून बाद झाले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. मात्र, ३१ डिसेंबरला उमेदवारांच्या कागदपत्रे छाननीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), आपसह अपक्षांचे अर्ज बाद झाले आहेत. जात वैधता प्रमाणपत्राची प्रत सादर न करणे यासह अन्य कागदपत्रे सादर न केल्यानेही काही अर्ज बाद झाल्याचे समोर आले आहे.
कुलाबातील प्रभाग क्रमांक २२६ मधील भाजप उमेदवाराचे प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि आप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने भाजप उमेदवाराला येथील निवडणूक सोपी झाल्याचे समजते. मुंबईतील अनेक प्रभागात अपक्ष उमेदवारांचाही पत्ता कागदपत्रे छाननीत कट झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षाकडून आपल्या प्रभागातील बंडखोर उमेदवाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापैकी किती बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बाद झालेल्या अर्जांमध्ये प्रभाग क्रमांक १०३ ते १०८, १०९, २०० ते २००६, १९३ ते १९९, १६३, १७५ व १७१ येथे दाखल झालेल्या अर्जांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मंगळवार, ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. बंडखोरी टाळण्यासाठी जवळपास सर्वच पक्षांनी जागावाटप, एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया शेवटच्या दोन - तीन दिवसांत सुरू केल्याने शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले. उमेदवार निश्चित करण्यासाठी गेलेला वेळ, आयत्यावेळी कागदपत्रांची जमवाजमव, जात वैधता प्रमाणपत्र, अर्जातील अपूर्ण माहिती आदी कारणाने छाननीत अपक्षांसह काही पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्जच बाद झाल्याने या उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही.
ठाकरेंच्या ५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरणार?
मालाड पूर्वेतील ईशान्य विभागातील निवडणूक कार्यालयात अर्जांची छाननी करण्यात येत असून, येथे शिंदे सेनेने ठाकरेंच्या पाच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३८, ३९, ४०, ४१ आणि ४२ मध्ये ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना उबाठाच्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे लक्षात आले आहे. त्यावर शिंदे सेनेचे विभागप्रमुख वैभव भरडकर यांनी आक्षेप घेतला आहे.
कॉंग्रेस, आपचा अर्ज बाद
प्रभाग क्रमांक २२६ मधून काँग्रेसचे मनोज कनोजिया आणि आपचे उमेदवार नवनाथ लाळगे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. येथून भाजपचे मकरंद नार्वेकर निवडणुकीसाठी उभे आहेत. येथे आणखी दोन अपक्ष असून या तिघांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
महायुतीला २११, २१२ वॉर्डमध्ये धक्का
प्रभाग क्रमांक २११ आणि २१२ मध्ये महायुतीला धक्का बसला आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने प्रभाग क्रमांक २११ मधील शिंदे सेनेच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला आहे. तर प्रभाग क्रमांक २१२ मध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर यांचा अर्जही बाद झाला आहे. खामकर या एबी फॉर्म मिळाल्यावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात उशिरा पोहोचल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे मनसेच्या उमेदवार श्रावणी हळदळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या प्रभागात अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. पण ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद पाहता हळदणकर यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे.
राज्यातील २,८६९ जागांसाठी ३३,६०६ अर्ज
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत २,८६९ जागांसाठी तब्बल ३३ हजार ६०६ उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
मुंबई महापालिकेसाठी २,५१६ अर्ज दाखल
बृहन्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एका दिवसात एकूण २,१२२ अर्ज दाखल झाले, तर २३ ते ३० डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्याच्या मुदतीत एकूण २,५१६ अर्ज दाखल झाले आहेत.