मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून आता रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत १२५ जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे, तर भाजपने त्यांना केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महायुतीत जागावाटपाच्या चर्चेच्या सुरुवातीलाच तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
एकसंध शिवसेनेने २०१७ मध्ये ८४ जागा जिंकल्या होत्या, पुढे मनसेसह अन्य काही नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याने ही संख्या ९९ वर पोहोचली होती. एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील ४७ नगरसेवक शिंदे गटात गेले. तसेच २००७ आणि २०१२ मधील काही माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने आपल्याकडे १०० हून अधिक माजी नगरसेवकांची फौज असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. याच बळावर त्यांनी १२५ जागांवर दावा केला आहे. मात्र, भाजपने केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिल्याने शिंदे सेनेची कोंडी झाली आहे. दोन्ही पक्षात गुरुवारी प्रभागनिहाय चर्चा होणार असली, तरी या प्रस्तावामुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे.
विद्यमान नगरसेवकांच्या जागा संबंधित पक्षच लढणार
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत, ज्या ठिकाणी महायुतीतील पक्षाचा विद्यमान नगरसेवक असेल ती जागा त्या पक्षाला देण्याच्या फॉर्म्युल्यावर महायुतीच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली, तर काही जागांची अदलाबदल होणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत महायुतीचा मराठी महापौर बसवणार
मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना - भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकावून पालिकेत महायुतीचा मराठी महापौर बसविणार, अशी प्रतिक्रिया माजी खासदार व शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी दिली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दादरच्या वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयात पार पडलेल्या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या बैठकीला शिवसेनेकडून शेवाळे यांच्यासह गृह राज्यमंत्री मंत्री योगेश कदम, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या. तर भाजपच्यावतीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम,आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर हे नेते उपस्थित होते.
नवाब मलिक प्रकरणी चर्चा नाही
नवाब मलिक यांच्या संदर्भात कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नसल्याचे नलावडे यांनी स्पष्ट केले. “नवाब मलिक हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि पक्षाने त्यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे,” असे ते म्हणाले.
महायुतीचा १५० जागा जिंकण्याचा निश्चय
या बैठकीत १५० जागांसह स्पष्ट बहुमत मिळवून मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा महापौर बसविण्याचा निश्चय करण्यात आला. तसेच नवाब मलिक यांच्याबाबत विचारणा केली असता, मुंबईत राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेनेला ते मान्य नसेल, अशी स्पष्ट भूमिका शेवाळे यांनी मांडली.
महायुती बैठकीस राष्ट्रवादीला निमंत्रण नाही
महायुतीतील समन्वयाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बैठकीचे निमंत्रण न दिल्याने पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी यासंदर्भात जाहीर प्रतिक्रिया देत भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतल्याचे सांगितले. नलावडे म्हणाले, “महायुतीसंदर्भात चर्चा होत असताना आम्हाला बैठकीस का बोलावले जात नाही, असा प्रश्न आम्ही आशिष शेलार यांच्याकडे उपस्थित केला. कोणाबरोबर चर्चा करायची, याबाबत पक्षाकडून कोणतेही अधिकृत पत्र आले नसल्याचे सांगत शेलार यांनी बोळवण केली,” असा आरोप त्यांनी केला.
मविआमध्येही रस्सीखेच
एकीकडे महायुतीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाला असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीत काही आलबेल असल्याचे चित्र नाही. मनसे व ठाकरे गटात युतीची चिन्हे दिसू लागल्याने काँग्रेसने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नसल्याने ते ठाकरे बंधूंना साथ देण्याची शक्यता आहे. मुंबईत आजही उद्धव ठाकरेंची ताकद आहे. त्यांना साथ देण्याची तयारी राज ठाकरे यांच्या मनसेने दर्शवली आहे. दोन्ही पक्षांत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, जर ही युती आकाराला आली, तर मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असाच अभूतपूर्व सामना रंगण्याची चिन्हे आहेत.