मुंबई

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, सर्वाधिक लक्ष मुंबईकडे केंद्रित झाले आहे. मतदारांच्या बोटावर लोकशाहीचा ठसा उमटणार असून तरुणाईमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, सर्वाधिक लक्ष मुंबईकडे केंद्रित झाले आहे. मतदारांच्या बोटावर लोकशाहीचा ठसा उमटणार असून तरुणाईमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय असलेली भाजपप्रणीत महायुती आणि दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या शिवशक्तीत देशातील सर्वाधिक श्रीमंत मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्वासाठी चुरशीची लढत रंगली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा समावेश असलेल्या महायुतीने राज्यभर प्रचार केला तर ठाकरे बंधूंच्या त्यांच्या पुत्रांसह मुंबईसह राज्यात निवडक सभा झाल्या.

मुंबईच्या महापौर पदावरून मराठी हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक व सर्वच राजकीय पक्षांकडून चर्चिला गेला. २०२२ मध्ये झालेल्या शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची ही पहिलीच पालिका निवडणूक आहे. अविभाजित शिवसेनेचे मुंबई पालिकेवर सलग २५ वर्षे वर्चस्व होते. २०२२ मधील फाटाफुटीनंतर एकनाथ शिंदे बहुसंख्य आमदारांसह पक्षाचे नाव आणि चिन्ह घेऊन वेगळे झाले त्यानंतरची ही शिवसेनेची पहिलीच मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे. विभाजनापूर्वीच्या अविभाजित शिवसेनेची देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर २५ वर्षे सत्ता होती.

या निवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेसने शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) या महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांच्या सावलीतून बाहेर पडत मुंबईत स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित केले आहे. मुंबईत काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षाशी हातमिळवणी केली असून नागपूरमध्ये मात्र काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी गटांनी स्थानिक पातळीवर युती केली आहे. पालिका निवडणूक ही फक्त महापालिका नव्हे तर महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई आहे. २०२० ते २०२३ या कालावधीत कार्यकाळ संपलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुका सहा वर्षांहून अधिक कालावधीनंतर होत आहेत. यापैकी नऊ महापालिका मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) असून हा देशातील सर्वाधिक नागरीकरण झालेला भाग आहे. मुंबईतील १,७०० आणि पुण्यातील १,१६६ उमेदवारांचा समावेश आहे. मतमोजणी १६ जानेवारीला होणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी २५ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

प्रमुख पक्षांची आश्वासने

महायुती : बेस्ट बसमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत

ठाकरे बंधू : घरगुती महिला कामगारांना ₹१,५०० मासिक भत्ता

काँग्रेस : प्रदूषण नियंत्रण, बेस्ट ताफा सुधारणा, आर्थिक शिस्त

मुंबईतील उमेदवार, मतदारांची संख्या

मुंबईतील २२७ नागरी प्रभागांमध्ये हे मतदान होणार असून ८७८ महिला आणि ८२२ पुरुषांसह १,७०० उमेदवार रिंगणात आहेत.

५५,१५,७०७ पुरुष, ४८,२६,५०९ महिला आणि १,०९९ इतरांसह एकूण १,०३,४४,३१५ पात्र मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावू शकतात. मतमोजणीसाठीही मुंबईत २३ ठिकाणी मतमोजणी केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

मुंबईतील पक्षनिहाय उमेदवार

  • भाजप – १३७

  • शिवसेना (शिंदे) – ९०

  • शिवसेना (ठाकरे) – १६३

  • काँग्रेस – १४३

  • मनसे – ५२

  • वंचित बहुजन आघाडी – ४६

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?

मतदार आज 'राजा'; मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक; साडेतीन कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अजित पवारांनी फोडला सिंचन घोटाळ्याचा 'बॉम्ब'; मतदानाआधीच मित्रपक्षांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ

'पाडू' मशीनवरून राज ठाकरेंचे निवडणूक आयुक्तांवर शरसंधान