मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट (Photo-X/@VarshaEGaikwad)
मुंबई

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत फूट पडली असून काँग्रेसने बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.

महाविकास आघाडीत मोठी फूट

मुंबई महापालिकेत सध्या सत्तेत असलेला शिवसेना ठाकरे गट सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप महायुतीच्या माध्यमातून मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. महायुतीमध्ये सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. असे असताना, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

मुंबई काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल

"बीएमसी निवडणुकीत विभाजनवादी, गरीबविरोधी व जनविरोधी महायुतीला पराभूत करण्यासाठी मुंबई काँग्रेस पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने मैदानात उतरेल. हा संघर्ष मुंबईकरांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण, तसेच हुकूमशाही वृत्ती, बेलगाम भ्रष्टाचार आणि सत्तेच्या लोभापासून मुंबईला वाचवण्यासाठी आहे," असे बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मुंबई काँग्रेस संसदीय कार्य समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सांगण्यात आले.

मुंबईचा अपेक्षित विकास नाहीच!

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून, मुंबईत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, “मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. अपेक्षित विकास झाला नाही. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.”

मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवू

पुढे ते म्हणाले, “आम्ही भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात निवडणूक लढवणार आहोत. सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे नागरिक आमच्यासोबत यावेत. सत्तेत आल्यानंतर मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने चालवू. यासाठी लवकरच जाहीरनामा सादर केला जाईल.”

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार, २३ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी, तर २ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मुंबई महापालिका निवडणूक केवळ सत्तासंघर्ष न राहता थेट राजकीय ध्रुवीकरणाची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत. महायुती आणि ठाकरे गटासोबतच आता काँग्रेस स्वतंत्र ताकदीने मैदानात उतरल्याने बीएमसी निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन

"हा अवॉर्ड आईसाठी!" जीवनातला पहिला-वहिला पुरस्कार स्वीकारताना आर्यन खानची प्रतिक्रिया; गौरी खाननेही खास पोस्ट करत केले कौतुक