मुंबई

मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची कमाल; ७.४८ कोटींची केली बचत

भांडुप येथील २००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अतिउच्चदाब (ईएचव्ही) विद्युत मनोरे सुरक्षितपणे स्थलांतरित करून मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांनी कंत्राटदार कंपनीने दिलेल्या अवास्तव खर्चाचे पुनर्मूल्यांकन करून पालिकेच्या सुमारे ७ कोटी ४८ लाख रुपयांची बचत केली आहे.

Swapnil S

मुंबई : भांडुप येथील २००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अतिउच्चदाब (ईएचव्ही) विद्युत मनोरे सुरक्षितपणे स्थलांतरित करून मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांनी कंत्राटदार कंपनीने दिलेल्या अवास्तव खर्चाचे पुनर्मूल्यांकन करून पालिकेच्या सुमारे ७ कोटी ४८ लाख रुपयांची बचत केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पाणीपुरवठा प्रकल्प विभागातील अभियंत्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला.

भांडुप संकुलात उभारला जात असलेला २००० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प कमी जागेत आणि शून्य सांडपाणी विसर्गाच्या संकल्पनेनुसार विकसित केला जात आहे. मात्र, प्रकल्पाच्या जागेतून टाटा पॉवर कंपनीच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्या जात असल्याने तीन विद्युत मनोरे स्थलांतरित करणे आवश्यक होते. या कामासाठी टाटा पॉवर कंपनीने १४ कोटी ७० लाखांचा अंदाजित खर्च सादर केला. त्यानुसार पालिकेने कंत्राटदारामार्फत आवश्यक आगाऊ रक्कम अदा केली. फेब्रुवारी २०२६ मध्ये सुमारे ५०० मीटर परिसरात पाच नवीन मनोरे उभारून वीजवाहिन्यांचे स्थलांतर पूर्ण केले. जुन्या तीनपैकी दोन मनोरे हटवण्यात आले आहेत.

सवलती, भंगार मूल्याची परतफेड

कामाच्या अंमलबजावणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा प्रकल्प विभागातील अभियंत्यांनी टाटा पॉवरने सादर केलेला खर्च जास्त असल्याचे निदर्शनाला आणले. त्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या आधारे खर्चाचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले तसेच लागू सवलती आणि हटवण्यात आलेल्या मनोऱ्यांच्या भंगार मूल्याची परतफेड मिळवण्यासाठी पाठपुरावा केला.

बचतीच्या रकमेत आणखी होणार वाढ

या प्रयत्नांमुळे टाटा पॉवर कंपनीने ५ कोटी ७६ लाख रुपयांची रक्कम महापालिकेला परत करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मनोरे स्थलांतरित करण्याच्या कामाचा प्रत्यक्ष खर्च ६ कोटी ६९ लाख रुपयांवर आला. याशिवाय कंत्राटदाराचे ओव्हरहेड्स, नफा आणि जीएसटीच्या बचतीमुळे महापालिकेची एकूण सुमारे ७ कोटी ४८ लाख रुपयांची आर्थिक बचत झाली आहे. हटवण्यात आलेल्या मनोऱ्यांच्या भंगार मूल्याची रक्कम मिळाल्यानंतर ही बचत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अभियंत्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

या कामगिरीबद्दल कार्यकारी अभियंता राजेश कापडणीस, सहाय्यक अभियंता ऋषिकेश वर्तक तसेच दुय्यम अभियंते गुरुराज ऐवळे आणि सुबोध नाखरेकर यांचा आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अभियंता चंद्रकांत चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरकारी जमिनीवर मालकी नोंदवणाऱ्यांना दणका; भाडेपट्टा नोंदीवर आता ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार

Mumbai : मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील ‘नॉईज बॅरिअर’ कोसळले; उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच दुर्घटना

रेरा कायदा कंत्राट कायद्यापेक्षा अधिक प्रभावी; घराचा ताबा देण्यास उशीर झाल्यास खरेदीदाराला दरमहा व्याज दिलेच पाहिजे, HC चा विकासकाला झटका

निवृत्तीवेतनधारकांसाठी १ जुलैपासून ‘महा-उपलब्धी’ ॲप

BEST संपाने मुंबईकरांचे हाल! केवळ ४८ बसेस रस्त्यावर